Maharashtra Assembly Election 2024 BJP Stand On CM Post: विधानसभेचा निकाल लागून चार दिवस उलटल्यानंतरही राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर महायुतीला देता आलेलं नाही. 230 हून अधिक जागा जिंकलेल्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन धुसपूस सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टी हा महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष ठरला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागा जिंकल्या आहेत. असं असतानाच आता मुख्यमंत्री पद कोणत्या पक्षाकडे द्यायचं यासंदर्भातील संभ्रम कायम आहे. मुख्यमंत्री पद पुन्हा शिंदेंकडेच रहावं यासाठी शिंदेंचे आमदार जोर लावत असतानाच भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्याने आणि जागांमधील फरक फार मोठा असल्याने मुख्यमंत्री पद भाजपाकडेच असावं असं म्हटलं आहे. या तू-तू मैं-मैं दरम्यान मुख्यमंत्री पद वाटून घेण्यासंदर्भातील बातम्याही समोर आल्या. असं असतानाच आता भाजपाने मुख्यमंत्री पदासंदर्भात कठोर भूमिका केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाचं विभाजन केलं जाणार नसल्याचं भाजपाने मित्रपक्षांना कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद पाच वर्षांसाठी भाजपाकडेच राहणार असल्याचं महायुतीमधील नेत्यांना कळवण्यात आलं आहे. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागणार आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद पुन्हा मिळावे म्हणून अडून बसल्याची चर्चा रंगली होती. मात्र भाजप पक्षश्रेष्ठी संपूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री पद स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाने कोणत्याही प्रकारे मुख्यमंत्री पदासंदर्भात तडजोड शक्य नसल्याचं दोन्ही मित्रपक्षांना कळवलं आहे.
दिल्लीतील पर्यवेक्षक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे निश्चित करतील असं सांगण्यात येत आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून 2 नेते पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्रात येणार आहेत. या पर्यवेक्षकांपैकी पहिलं नाव केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं असून त्यांच्याबरोबर आणखी एक नेता पर्यवेक्षक म्हणून पाठवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदारांशी स्वतंत्र चर्चा करून विधिमंडळ पक्षाचा गटनेता ठरवला जाणार आहे. पर्यवेक्षक आमदारांसोबत 2 बैठका घेऊन भूमिका समजून घेणार आहेत.
राज्याच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असावं यावर दिल्लीत खलबत सुरु झाली आहेत. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनेक नावांवर चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समतोल राखत मंत्रिपद दिली जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सगळ्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळाल पाहिजे याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा भर असल्याचे समजते. मुख्यमंत्री यांच्यासोबत होणाऱ्या शपथविधी वेळी भाजपच्या 10 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्र्यांची अंतिम यादी दिल्लीत तयार होणार असल्याचेही समजते.