शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शह-काटशहाचे राजकारण

Maharashtra Politics : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले असून महायुती आणि महायुतीत थेट लढत होणार आहे. महायुतीचे नेते पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत असताना महायुतीत शह-काटशहाचे राजकारण रंगलंय.  

Updated: Nov 5, 2024, 11:27 PM IST
 शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शह-काटशहाचे राजकारण title=

Maharashtra Assembly Elections 2024 :  महायुतीत बंडखोरांनी डोकेदुखी वाढवलेली असतानाच जशास तसे भूमिकेतून शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमदेवार एकमेकांना भिडतायेत. नांदगावमध्ये समीर भुजबळांनी अपक्ष म्हणून शिवसेनेच्या सुहास कांदेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर दादा आणि शिंदेमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झालंय.

महायुतीत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र असली तरी राज्यातल्या अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष निर्माण झालाय. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर हा संघर्ष अधिक ठळकपणे जाणवू लागलाय.

नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये शिवसेनेच्या सुहास कांदेंविरोधात समीर भुजबळ यांनी बंडखोरी केलीय. मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिकांविरोधात शिवसेनेचे सुरेश पाटील मैदानात उतरले आहेत. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सना मलिकांविरोधात शिवसेनेचे अविनाश राणे रिंगणात आहेत. पुण्यातील पुरंदर मतदारसंघात विजय शिवतारेंविरोधात राष्ट्रवादीच्या संभाजी झेंडेंनी दंड थोपटलेत.

नाशिकच्या देवळालीत राष्ट्रवादीच्या सरोज आहिरेंना शिवसेनेच्या राजश्री आहिरराव यांनी आव्हान दिलंय. भुजबळांनी हा वाद मुंबईत सोडवणार असल्याचं सांगितलंय. नांदगावमधील समीर भुजबळांच्या बंडखोरीवरुन हेमंत गोडसेंनी भुजबळांनाच लक्ष्य केलंय.

महायुतीत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु झालंय. विशेष म्हणजे महायुतीतील सर्वात मोठा भाऊ असलेल्या भाजपची या वादात अलिप्तवादी भूमिका सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x