Maharashtra Budget 2023: राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेची घोषणा केली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांना आता अवघ्या निम्म्या दरांत प्रवास करता येणार आहे. ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे. याआधी राज्यात 75 वर्षावरील नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत करण्यात आला आहे.
तसेच मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटूंबातील मुलींच्या जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहे. याचदरम्यान महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवण्यात येणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील तिकिटदरात महिलांना आता 50 टक्के सरसकट सवलत दिली जाणार आहे. तसेच एसटी महामंडळात 5 हजार ई बॅटरी बस आणणार आहेत.