महाराष्ट्रात सीईटीला अखेर मुहूर्त सापडला, 'या' दिवसांत होणार परीक्षा

 महाराष्ट्रात सीईटी ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार 

Updated: Sep 3, 2020, 07:27 AM IST
महाराष्ट्रात सीईटीला अखेर मुहूर्त सापडला, 'या' दिवसांत होणार परीक्षा  title=

मुंबई : कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सीईटी परीक्षेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. महाराष्ट्रात सीईटी ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

१ ते १५ ऑक्टोबर दरम्यान सीईटी घेण्यात येणार असून लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) घेतली जाते. दरवर्षी साधारणतः मे महिन्यात सीईटी होते. 
मात्र यावर्षी कोरोनामुळे परीक्षा अद्याप होऊ शकलेली नाही.

ऑक्टोबरमध्ये सीईटी घेतली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास सुरू ठेवण्याचं आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलंय.विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये समुपदेशन 

सीईटी परीक्षेसंदर्भात समिती

बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याबाबत  महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. बारावीनंतर आणि पदव्युत्तरसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे नियोजन संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीने सर्व उपाययोजना करून आपले वेळापत्रक तयार करावे, असे आवाहन सामंत यांनी केले होते.

प्रत्येक जिल्ह्यांमध्ये समुपदेशन केंद्र

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक  जिल्ह्यांमध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल, अशा सूचना देखील सामंत यांनी मागच्या बैठकीत दिल्या होत्या.