Belgaum Rada : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Issue) आता चांगलाच चिघळला आहे. बेळगवाच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर ( Belagava Hirebagewadi Toll Plaza) कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी (Kannada Rakshana Vedike) तुफान दगडफेक केली. महाराष्ट्रातून (Maharashtra) आलेल्या गाड्यांवर कन्नड वेदिकेत्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत काचा फोडल्या. महाराष्ट्रातून आलेल्या गाड्यांवर तुफान दगडफेक करत, गाड्यांना काळं फासत तोडफोड करण्यात आली. हिरेबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा धिंगाणा घातलाय.
उपमुख्यंत्री फडणवीस यांनी नोंदवला निषेध
बेळगावातल्या राड्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. बेळगावात कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या राड्याबद्दल फडणवीस यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाईल असं बोम्मई यांनी म्हटलंय.
ठाकरे गट आक्रमक
कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेत. कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मस्ती जिरवू आणि कर्नाटकला जशास तसं उत्तर देऊ असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. तुम्ही पाच गाड्या फोडल्यात तर आम्ही कर्नाटकाच्या 50 गाड्या फोडू असा इशारा ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिलाय.
खासदार सुप्रिया सुळे यांनी साधला निशाणा
शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झाला, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. 1986 च्या बेळगाव आंदोलनातले शरद पवारांचे (Sharad Pawar) फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर करत आठवणी जाग्या केल्यात. 1986 च्या आंदोलनात शरद पवारांनी लाठ्या खाल्या पण माघार घेतली नाही याची आठवण त्यांनी करुन दिलीय. महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी करण्यात आली होती. पण ड्रायव्हर असल्याची बतावणी करत पोलिसांना चकमा देऊन शरद पवार बेळगावात पोहोचले. शरद पवारांसह इतरांना बेदम मारहाण कर्नाटक पोलिसांनी केली. समाजवादी नेते एस. एम. जोशीही शरद पवारांच्या पाठीवरचे वळ पाहून हळहळले होते. अशी आठवण सुप्रिया सुळेंनी सांगत बेळगावला न जाणा-या मंत्र्यांवर निशाणा साधलाय.
संजय राऊत यांचा घणाघात
महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे प्रयत्न करणा-यांचेच तुकडे होतील अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. देशात केवळ निवडणुकांचं राजकारण केलं जात असल्याची टीका राऊतांनी केलीय. गुजरात सीमेलगत सुरगाणा तालुक्यातली काही गावं गुजरातमध्ये जाण्याची मागणी करत आहेत. सोलापूर अक्कलकोटवर कर्नाटकने दावा सांगितलाय. तर सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या काही गावांना पाण्यासाठी कर्नाटकात जायचंय. या मागण्या केवळ निवडणुकांसाठी असल्याचं राऊत म्हणाले.