Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बऱ्याच दिवसांनी रविवारी बारामती दौरा केला. मागील अनेक आठवड्यांपासून उपमुख्यमंत्री बारामतीत आले नव्हते. याबाबत बारामतीत अनेकजण उलट सुलट चर्चा करत होते. यावर अजित पवार यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणी प्रश्न सोडवण्याच्या कामात मी व्यस्त होतो. त्यामुळे त्या काळात मी येऊ शकलो नाही. त्यामुळे अनेकांना वाटलं की मी नाराज आहे काहीतरी गडबड आहे. मात्र मी नाराज नाही. मी मागेच जाहीर केले आहे की, "झालेल्या पराभवाला मी स्वतः जबाबदार आहे," असं उत्तर देत अजित पवारांनी टीकाकारांची तोंड बंद केली आहे. बारामती तालुक्यातील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून बारामती तालुक्यातील बोरकरवाडी तलावात बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी पोहोचविण्याच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
"अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून गरीब वर्गाला काहीतरी चांगले देण्याचा प्रयत्न मी व माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी केला आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली गेली," असंही अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये सरकारी योजनांबद्दल बोलताना म्हटलं. "ही योजना देखील खूप लोकप्रिय झाली आहे. काही जणांना हे आवडलेलं नाही. त्यामुळे ते बदनामी व अपप्रचार करत आहेत," असा टोलाही पवारांनी विरोधकांना लगावला.
नक्की पाहा हा व्हिडीओ >> 'एकच वादा, अजित दादा..' ऐकल्यावर अजित पवारांना हसू अनावर! हात जोडत म्हणाले, 'लोकसभेला हा वादा..'
"मी अनेक ठिकाणी भेटणाऱ्या माता-भगिनींना विचारत असतो की, आपण लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज वगैरे केलेत का? या योजनेच्या माध्यमातून गरीब वर्गातील माता-भगिनी मुलींना मदत करण्याचा आमचा हेतू आहे. या योजना आपल्याला पुढे देखील चालू ठेवायचे आहेत. मात्र विरोधक आमच्यावर वेगवेगळे आरोप करतात," असं अजित पवार म्हणाले.
"लडकी बहीणसारख्या योजना म्हणजे चुनावी जुमला आहे," अशी टीका विरोधक करत असल्याच्या मुद्द्यावरुनही अजित पवारांनी भाष्य केलं. "मी 10 वर्ष या राज्याचा अर्थमंत्री होतो व आजही आहे. त्यामुळे राज्याच्या कोणत्या योजनेला किती निधी द्यायचा याचे सारे गणित आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे हा निर्णय आम्ही विचारपूर्वक घेतलेला आहे. जर फसवाफसवी केली आणि आम्ही उद्या लोकांच्या दारात गेलो तर काहीही थापा मारतो, असे आम्हाला ते म्हणतील," असं म्हणत अजित पवारांनी आपल्याला जबाबदारीचं भान असून विचापूर्वक पद्धतीनेच लाडकी बहीण योजना राबवण्यात आल्याचं अधोरेखित करण्यात आलं.