Rohit Patil: महाराष्ट्राच्या विधानसभेतून ज्या दिवशी राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी माघार घेतली. त्याच दिवशी त्यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे आबांनी ज्या दिवशी विधानसभागृहातून माघार घेतली, त्याच दिवशी रोहित पाटलांनी विधानसभेत एन्ट्री केली,त्यामुळे हा नियतीचा खेळ की योगायोग, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील हे निवडून आले आहेत. सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रोहित पाटील यांचा शपथविधी नुकताच आठ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पार पडला. आणि हा शपथविधीचा दिवस रोहित आर. आर पाटलांसाठी महत्त्वाचा ठरला. कारण याच सभागृहातून आठ डिसेंबर 2014 रोजी स्वर्गीय आर. आर. पाटलांनी आपली प्रकृती ठीक नसल्याने काही दिवस सभागृहात अनुपस्थितीत राहण्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं.
मात्र, दुर्दैवाने त्यानंतर आबा सभागृहात पुन्हा कधीच गेले नाहीत.आणि काही महिन्यानाने आर आर पाटलांचं निधन झाले.त्यामुळे आठ डिसेंबर 2014 हा आर आर पाटलांसाठी विधानसभेचे शेवटचा दिवस,पण नेमकं त्याच दिवशी तब्बल दहा वर्षानंतर आर आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटलांच्या आमदारकीचा शपथविधी पार पडला, सात तारखेला खरंतर रोहित पाटलांचा शपथविधी होणार होता मात्र विरोधकांनी सभात्याग केल्याने त्या दिवशीचा शपथविधीचा दिवस टळला पण 8 डिसेंबर रोजी रोहित पाटलांनी आपली आमदारकीची शपथ घेतली.
राज्याच्या राजकारणातील हा भावूक क्षण असल्याचं बोललं जातंय. 8 डिसेंबर हाच तो दिवस होता ज्या दिवशी आर. आर पाटलांनी विधानसभेला अखेरचं निरोप दिला होता. आबांच्या या ८ डिसेंबर 2014 चा विधानसभा अध्यक्षांना लिहिलेले पत्र रोहित पाटलांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट केले आहे.
रोहित पाटील यांच्याबरोबरच सुहास बाबर यांच्यासोबतही असाच योगायोग घडला आहे. माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील आणि माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर या दोघांचीही मैत्रीचे पाऊल विधिमंडळात 1990 मध्ये पडलं होतं.त्याचीच पुनरावृत्ती त्यांच्याच सुपुत्रांकडून यावेळी पाहायला मिळाली आहे ,आर आर पाटलांची सुपुत्र रोहित आर आर पाटील आणि स्वर्गीय अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर हे दोघेही एकाच वेळी नागपूरच्या विधानसभेत अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित राहिले, विशेष म्हणजे हे दोघेही विधानसभेच्या प्रवेशद्वारावरून एकत्र सभागृहा पर्यंत पोहोचले.त्यामुळे आर आर आबा आणि अनिल भाऊ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा तर मिळालाच शिवाय या निमित्ताने योगायोग देखील पाहायला मिळाला.
1990 मध्ये स्वर्गीय आर आर आबा पाटील तासगाव मतदार संघातुन निवडून आले होते,त्याच बरोबर खानापूर मतदारसंघातून आबांचेच मित्र असणारे अनिल बाबर हे देखील आमदार म्हणून निवडून आले होते.या दोघांनीही एकत्रित आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला होता.योगायोगाने आता आबांचे सुपुत्र रोहित आर आर पाटील आणि अनिल भाऊंचे सुपुत्र सुहास बाबर हे दोघेही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत,आणि वडिलांप्रमाणेच योगायोगाने हे दोघेही नागपूरच्या विधानसभा अधिवेशनासाठी एकत्रित दाखल झालेत.