दौंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, संजय राऊत यांची राहुल कुल यांच्या कारखान्यावर धडक... पोलिसांनी अडवलं

दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर संजय राऊत धडकणार, या कारखान्यात 500 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

Updated: Apr 26, 2023, 06:22 PM IST
दौंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, संजय राऊत यांची राहुल कुल यांच्या कारखान्यावर धडक... पोलिसांनी अडवलं title=

Sanjay Raut : दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या कारखान्यात 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत याप्रकरणाची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. पण या आरोपांनंतरही राज्य सरकारकडून किंवा संबंधित तपास यंत्रणांकडून पावलं उचलण्यात आली नव्हती. पण यानंतर संजय राऊत राहुल कुल यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. 

दौंडच्या रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा
संजय राऊत यांची जाहीर सभा वरवंड या ठिकाणी होत आहे. त्याआधी खासदार संजय राऊतांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या दौंडमधल्या भीमा पाटस कारखान्यावर धड़क दिली.  वाटेत त्यांना पोलिसांनी अडवलं. त्यामुळे राऊत आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. खासदाराला अडवलं म्हणून हक्कभंग आणण्याचा इशारा राऊतंनी पोलिसांना दिला. अखेर पोलिसांनी राऊतांना कारखान्याच्या आवारात जाऊ दिलं. कारखान्याच्या आवारातल्या पुतळ्याला राऊतांनी पुष्पहार घातला त्यानंतर राऊत सभेच्या ठिकाणी रवाना झाले. 

संजय राऊत यांची प्रतिक्रिया
पोलिसांनी अडवल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना उत्तरं दिली. ही गुंडशाही आणि झुंडशाही आहे. वेळ पडली तर गुंडशाहील गुंडाशाहीने उत्तर देण्याची ताकद आमच्यात असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. कारखान्याचा दरवाजा बंद करण्यात आला आहे, यावरुन ते किती घाबरले आहेत, हे दिसतं. हा कारखाना इतर कोणत्या पक्षाच्या खासदाराचा किंवा आमदाराचा असता तर हे पोलीस किरिट सोमय्यांना स्वत: आतमध्ये घेऊन गेले असते, असा टोलाही राऊत यांनी लगावलाय. केंद्रात पोलिसांवर हक्कभंग आणण्याची मागणी करणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. 

राहुल कुल यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार
दरम्यान, संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. भीमा-पाटस सहकारी कारखान्यात 500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून याप्रकरणी तक्रार करुनही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे आपण सीबीआयकडे तक्रार केली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. 

याप्रकरणात संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्यांनी भीमा-पाटस सहकारी कारखआन्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा उल्लेख करण्यात आला होता. या भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. भाजचे किरिट सोमय्या या भ्रष्टाचारावर गप्प आहेत, हे प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडे देऊन घोटाळेबाजांवर कारवाई करावी अशी मागणी राऊत यांनी केली आहे.