कसं काय 'केसरी' पाटील बरं हाय का? इतकं मानधन मिळालं हे खरंय का?

खंत व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्र केसरीला मिळालं इतकं मानधन.. 

Updated: Apr 10, 2022, 11:05 PM IST
कसं काय 'केसरी' पाटील बरं हाय का? इतकं मानधन मिळालं हे खरंय का? title=

सातारा : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजयी झालेल्या कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने एक खंत व्यक्त केली होती. टायटल आणि गदा या शिवाय महाराष्ट्र केसरीचं कोणतंही मानधन संयोजकांकडून मिळालं नाही असा आरोप पाटील यानं केला.

पृथ्वीराज पाटील यानं केलेल्या या आरोपावर कार्यक्रमाचे आयोजक दिपक पवार यांनी तातडीनं स्पष्टीकरण दिलं. महाराष्ट्र कुस्ती परिषदेनं आम्हाला यजमान पद दिलं. हे यजमान पद देताना त्यांनी आम्हाला कोणालाही मानधन द्यावे लागेल असं सांगितले नव्हते. त्यामुळे मानधन आम्ही देण्याचा प्रश्नच उपस्थित राहत नसल्याचा खुलासा केला. 

पृथ्वीराज पाटील यांनी मागणी केली तर आम्ही ती रक्कम द्यायला तयार असल्याचंही पवार यांनी सांगितलं. आयोजक दीपक पवार यांनी हा खुलासा केला असला तरी पृथ्वीराज पाटील यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला आयोजकांनी बक्षीस देणं गरजेचे होतं. मात्र, ते का दिलं नाही याची चौकशी करणार असल्याचं सांगितलं.

पृथ्वीराज पाटील याने केलेल्या या आरोपाची लाळ कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या रणांगणात उमटली. निवडणुकीच्या रणांगणात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आदी दिगग्ज शड्डू ठोकून उतरले होते.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्र केसरीची  गदा पटकाविल्याबद्दल पृथ्वीराज पाटील याचे अभिनंदन केले. तसेच, भाजपच्यावतीने पृथ्वीराज पाटील याला कुस्तीच्या सरावासाठी 5 लाख रुपये जाहीर केले. 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यश मिळाल्यानंतर पृथ्वीराज पाटील आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यानंतर रात्री गदेला बिलगून असा झोपला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यश मिळाल्यानंतर पृथ्वीराज पाटील आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यानंतर रात्री गदेला बिलगून असा झोपला.

त्यापाठोपाठ गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पृथ्वीराज पाटील याला 2 लाख रुपयांचे मानधन जाहीर केले. देसाई यांच्या स्वर्गीय शिवाजीराव देसाई ट्रस्टच्यावतीने 2 लाख रुपयांचा धनादेश पाटील यांना कोल्हापूरला पाठवून दिला. 

तर, कोल्हापूर महाविकासआघाडीनेही महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील याला पाच लाखाचे बक्षीस जाहीर केले. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी या बक्षिसाची घोषणा केली. 

महाराष्ट्र केसरीचे मानधन न मिळाल्याची खंत पृथ्वीराज पाटील याने व्यक्त केली आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्षांनी त्याच्यावर लाखोंची बरसात केली.