विशाल करोळे, लातूर, झी 24 तास | राज्यात सर्वत्र उष्णेतची लाट आहे. कडक उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होतेय. एकाबाजूला असा कडक उन्हाळा असताना मात्र राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळीमुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. तसे या अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (unseasonal rains in latur many trees were uprooted)
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. वादळी वाऱ्याने शहरातील औसा रोड तसेच लातूर बार्शी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. जिल्ह्यात सकाळपासूनच उन्हाचा कडाका होता. मात्र अचानक दुपारनंतर ढगाळ वातावरण झालं.
अचानक झालेल्या अवकाळीमुळे उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या लातूरकरांची काही मिनिटांसाठी का होईना पण सुटका झाली. पण या अवकाळीमुळे आंबा पिकासह भाजीपाला, ज्वारी, द्राक्ष, गहू पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.