मुंबई : Maharashtra Political Crisis : शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ खडसे यांनी वेगळी चूल मांडत शिवसेना आणि पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शह दिला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. दरम्यान, नव्या सरकारचा रविवारी शपथविधी होणार असल्याची माहिती हाती आली आहे. शपथविधीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना असलेली ऑफरच शिंदेंना भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदं शिंदे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंसह 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या 6 मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्या सहाही मंत्र्यांना नवा सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे.
शिवसेनेचे एकामागून एक आमदार एकनाथ शिंदेच्या गोटात जात असताना काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. दरम्यान सरकार कोसळण्याची वेळ आल्यास मध्यवधी निवडणुका नको असा सूर काँग्रेस आमदारांकडून पुढे येत आहे. निवडणुका नको वेळ आल्यास विरोधी बाकांवर बसू, अशी मागणी काँग्रेस आमदारांनी कमलनाथांकडे केली आहे. विधानसभा बरखास्त करु नका, अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली आहे.