2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती, आजपर्यंत राष्ट्रवादीचाच CM असता! पण…

NCP Ajit Pawar Speach: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांद केलेल्या जाहीर भाषणामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अनेक गोष्टींचा संदर्भ देत अजित पवारांनी ही टीका केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 5, 2023, 03:27 PM IST
2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती, आजपर्यंत राष्ट्रवादीचाच CM असता! पण… title=
शरद पवारांवर अजित पवारांची टीका

Ajit Pawar Speech in Meet: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा थेट उल्लेख न करता टीका केली आहे. एमईटी येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान केलेल्या जाहीर भाषणामध्ये अजित पवारांनी 2004 साली पक्षाकडे मुख्यमंत्रीपद चालून आलेलं असताना वरिष्ठ नेत्यांनी ती संधी न घेता चार मंत्रीपद अतिरिक्त घेतली. मात्र तेव्हा संधी घेतली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री राज्यात असता असं अजित पवार यांनी जाहीर भाषणात म्हटलं आहे.

साहेबांना अनेकदा साथ दिली

अजित पवार यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर, राष्ट्रवादीवर ही वेळ का आली? असं म्हणत शरद पवारांचा राजकीय प्रवास सांगितला. "मला आठवतयं एकंदरितच मी राजकीय जीवनात काम करत असताना साहेबांच्या छायेखाली आणि मार्गदर्शनाखाली तयार झालेलो आहे.
साहेब आपले सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज देशपातळी, राज्यपातळीवर राजकारण चाललं आहे. एखादा पक्ष लोकांची काम करण्यासाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्यायदेण्यासाठी, संविधानातील न्याय देण्यासाठी, सर्वसाधारण सामाजाने गुण्यागोविंदाने नांदावं यासाठी आपण काम करतो फार मागे जाणार नाही. आपल्या वरिष्ठ नेत्यांनी 1962 मध्ये विद्यार्थी दशेत केली. 69 ला निवडणूक लढवली. 75 ला ते मंत्री झाले. 78 ला त्यांनी पुलोदची स्थापना केली. तेव्हा साहेब 38 वर्षांचे होते. तेव्हापासून महाराष्ट्राने साथ दिली आहे. 78 नंतर 80 चा काळ आला. इंदिराजींची लाट आली. पुलोदमध्ये राष्ट्रीय संघ होता जो आता भाजपा आहे. अनेकजण यात होते.  80 ला सरकार गेलं. तेव्हा इंदिराजींनी सांगितलेलं तुम्ही काँग्रेसमध्ये आला तर जसेच्या तसे सरकार ठेवते. नाही सांगितलं. सरकार केलं. 77 नंतर पुन्हा लाट आली इंदिरा गांधींची. कोणी ना कोणी करिष्मा असलेलं नेतृत्व लागतं. लोकशाही आहे. जयप्रकाश नारायण यांचं ऐकून जनता पक्षाला निवडून दिलं. 77 ला देशपातळीवर निवडून आलेला पक्ष आज शोधावा लागतोय. त्यानंतर 85 ला पुन्हा सामांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस असे वेगवेगळे पक्ष साहेबांनी काढले. आपण सगळ्यांनी साथ दिली," असं अजित पवार म्हणाले.

"मला पहिल्या टर्मला कृष्णा खोऱ्याचे फक्त सात जिल्ह्याचं खातं मिळालं"

"प्रत्येकाचा एक काळ असतो. आपण साधारण वयाच्या 25 पासून 75 पर्यंत उत्तम पद्धतीने काम करु शकतो. उत्साह, जोश असतो. समाजासाठी काहीतरी करायचा उत्साह असतो. आम्हाला सांगण्यात आलं. 8 डिसेंबर 1986 ला सांगण्यात आलं समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाली. त्यानंतर 2 वर्ष नेत्यांना पद मिळालं नाही. 88 ते 90 मुख्यमंत्रीपद दिलं. 90 ला पुन्हा निवडणूक, पूर्ण बहुमत आलं नाही. अपक्षांनी साध दिली. 91 ला खासदार झालो. अनेकांना खासदार केलं. त्यावेळे दुर्देवाने राजीवजी आपल्यातून निघून गेले. एक लाट आली ज्यात नृसिंहराव यांना पंतप्रधान करण्यात आलं. नृसिंहराव केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेले साहेब. नृसिंहराव यांनी पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं. 94-95 ला मंत्रीमंडळ अस्थित्वात आलं. मनोहर जोशी, नारायणराव मुख्यमंत्री झाले, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. 99 ला निवडणूक लवकर घेतल्या. तेव्हा एकत्र काँग्रेस होती. आम्हाला सांगितलं सोनिया गांधी परदेशी आहेत. परदेशी व्यक्ती या देशाच्या पंतप्रधान होऊ शकत नाही. सांगितलं होतं की नव्हतं? 1999 ला 10 जूनला भुजबळांनी पुढाकार घेतला शिवाजीपार्कला सभा घेतली. सर्वांनी साथ दिली. त्यानंतर चार महिन्यात निवडणुका लागल्या. साडेचार वर्षात निवडणुका घेतल्या. संपूर्ण मैदान गाजवण्याचं काम भुजबळसाहेबांनी केलं. आर. आर. पाटील, मी, जयंत पाटील, सुनील तटकरे आम्ही सर्व तरुण होतो. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटायचं. आपल्याला त्यावेळेस ५८ जागा मिळाल्या. राज्यात ताकदीचा नेता नसताना 75 जागा मिळाल्या. आम्ही सगळ्यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात काम केलं. मला पहिल्या टर्मला कृष्णा खोऱ्याचे फक्त सात जिल्ह्याचं खातं मिळालं. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण मी केलं नाही. पहाटे मी कामाला सुरुवात करतो. रात्री उशीरा पर्यंत काम करतो. हे सर्व महाराष्ट्र पुढे गेलं पाहिजे म्हणून काम करतो. देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य व्हावं म्हणून मी काम करतो," असं अजित पवार म्हणाले.

...तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असता

"2004 ला आपण भुजबळ आणि आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एवढं चांगलं काम केलं की आपले 71 आमदार निवडून आले. काँग्रेसचे 69 आमदार आले. तेव्हा मला एवढं महत्त्वाचं स्थान नव्हतं कारण मी छोटा कार्यकर्ता होतो. भुजबळसाहेब, पिचडसाहेब, विजयदाद, पदमसिंह पाटील, दिल्लीत प्रफुल्ल पटेल साहेब हे सगळे प्रमुख नेते होते. त्यामध्ये सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं सगळ्यात जास्त जागा त्यांच्या आलेल्या आहेत. आपल्याला त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल. स्वर्गीय विलासराव हयात नाहीत. मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. आम्हाला विलासरावांनी सांगितलं आता तुमच्यामध्ये कोण होईल. त्यावेळेस भुजबळसाहेब, आर. आर. पाटील होते. माझी काही त्यावेळेस इच्छा नव्हती कारण हे प्रमुख नेते म्हणून काम करत होते. खरं ते मान्य केलं पाहिजे. सगळं आपल्यालाच मिळालं पाहिजे असा हव्यास कोणीही मनात ठेवता कामा नये. पण चार मंत्रीपद जास्त घेऊन आलेली संधी. उभ्या भारताने पाहिलं संधी आली होती. मी आज 2023 मध्ये तुम्हाला सांगतो ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री तुम्हाला दिसला असतो. आम्ही लोकांमध्ये मिसळायला कमी आहोत का? लोकांचा आदर करायला कमी आहोत का? आमच्या आमदाराने काम करावं, विकास करावा, जिल्ह्याला पुढे घेऊन जावं ही मतदारांची अपेक्षा असते. मी तसेच काम करत आलोय," असं अजित पवार यांनी सांगितलं.