अवकाळी पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका, पावसाचे संकट कायम

Rain in Maharashtra​ : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. 

Updated: Dec 2, 2021, 08:43 AM IST
अवकाळी पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका, पावसाचे संकट कायम

मुंबई : Rain in Maharashtra : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. द्राक्ष, कांदा, आंबा संकटात आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. दरम्यान, उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे.

आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, उद्यापासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. येत्या पाच दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा, कुलाबा वेधशाळेने वर्तवला अंदाज आहे. राज्यातल्या रब्बी हंगामावर अवकाळी संकट आलंय. सर्वाधिक फटका टोमॅटो, कांदा आणि द्राक्षांना बसलाय. त्यामुळे बळीराजा पार मेटामुकुटीला आलाय. कोकणातला आंबाही मोठ्या संकटात सापडला आहे.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 176 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांसह लाल कांदा, टोमॅटो आणि भात पिकाला सर्वाधिक फटका बसलाय. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. राज्यात पुन्हा आलेल्या अवकाळी पावसानं अनेक नगदी पिकांना फटका बसला आहे.  तर ढगाळ वातावरणामुळे कांद्यालाही दणका दिला आहे. येवल्यातील कांदा उत्पादकांना नुकसान टाळण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे.

अवकाळी पावसामुळे कांद्यावरही मावा, करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात टॉमेटोचंही मोठं उत्पादन होते. खरंतर सध्या टॉमॅटोला चांगला भाव मिळतोय. मात्र पावसामुळे काढणीला आलेला टोमॅटोचं नुकसान होतंय. या स्थितीमुळे शंभरीच्या पार गेलेल्या टोमॅटोचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळीचा कोकणातील आंबा आणि काजू बागांनाही फटका बसलाय. आंब्यावर तुडतुडे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.