Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून मूळ नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. तावडेच्या मदतीने अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशातच आता अपघात प्रकरणात मदत केल्याने तावरेला ससूनचा अधीक्षक म्हणून नियुक्ती करा, असं पत्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलं होतं, असा आरोप करण्यात येतोय. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत घणाघाती आरोप केलाय.
काय म्हणाले Jitendra Awhad ?
पुण्यात घडलेल्या अग्रवाल प्रकरणात रोजच नव्या बाबी समोर येत आहेत. एका मोठ्या बापाच्या मुलाला वाचवायला कित्येक अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी आपल इमान त्या रात्री विकले, हे समजून घेताना अक्षरशः मनाचा संताप होतोय. आरोपीचे ब्लड सँपल डॉ अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी चक्क कचऱ्यात फेकले. त्याऐवजी दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीचे ब्लड सँपल या लोकांनी पोलिसांना दिले. इतकंच नाही तर याचा रिपोर्ट द्यायला 4-5 दिवसांचा वेळ लावला. एरवी 2 तासात मिळणारे सँपल रिपोर्टला इतका वेळ का लागत असावा? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला आहे.
बाकी या डॉक्टरांना ससून हॉस्पिटलची पोस्टिंग मिळावी यासाठी अपघात झाला त्यादिवशी जातीने लक्ष घालणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला होता, अशी देखील माहिती समोर येत आहे. हा तोच डॉक्टर आहे जो ललित पाटील ड्रग्स प्रकरणात देखील संशयाच्या छायेखाली होता. पुणे पोलिस, ससूनचे डॉक्टर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे मिळून एका बड्या बापाच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तर जितके प्रयत्न करत आहेत तितकेच अजून जनते समोर नागडे होत आहेत. हा सगळा प्रकार अत्यंत किळसवाणा आणि चीड आणणारा आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केलीये.
दरम्यान, पुण्यात पब आणि बार मालकांकडून हप्तेवसुली केली जाते. महिन्याला किती हप्ता गोळा केला जातो याची यादीच पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी सादर केलीय. पुण्यात नाईट लाईफला पाठीशी घालण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांचा मोठा वाटा आहे. राजपूत यांना महिन्याला पैशाचं पाकीट पुरवलं जात असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी पुण्यात बार आणि पबमधून किती हप्ता वसूल केला जातो याची यादीच वाचून दाखवली.