Maharashtra Assembly Winter Session : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद (maharashtra karnataka border dispute) प्रकरण पुन्हा एकदा चिघळला आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधकांकडून महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नावर सभागृहात ठोस चर्चा होण्याची मागणी केली जात आहे. यावेळी विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करण्याचा ठराव करण्यात यावा अशी मागणी केली आहे. विधान परिषदेत भाषण करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली.
हा लढा दोन भाषांमधला नाही - उद्धव ठाकरे
"सभागृहातील सदस्यांचे या विषयावर एकमत आहे त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. मराठी माणसाठी आणि महाराष्ट्राच्या न्यायहक्कासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली त्याबद्दल धन्यवाद. मी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र म्हणणे याचे कारण म्हणजे आज आपण ठराव कोणी आणावा यावरच बोलतो आहोत. ज्यावेळी भाषावर प्रांतावर रचना झाली त्याच्याआधीपासून तिथे मराठी भाषा मुरलेली आहे. तिथल्या कित्येक पिढ्या मराठी भाषेमध्ये बोलत आहेत. हा लढा दोन भाषांमधला नाही. हा माणुसकीचा लढा आहे. तिथलं लोकं आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे असं म्हणत आहेत," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तेव्हा लाठ्या खाल्ल्यात म्हणून आता गप्प बसायचं
"हा वाद सुरु झाल्यापासून मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड माणसांवर अत्याचार केल्याचे एकतरी उदाहरण दाखवावं. काही जणांनी खालच्या सभागृहात आम्हीसुद्धा लाठ्या खाल्या आहेत तुम्ही काय सांगता असे सांगितले. पण जेव्हा लाठ्या खाल्ल्यात तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होतात. आता सीमापार करुन तुम्ही दुसऱ्या राज्यात गेलात. त्यामुळे तेव्हा लाठ्या खाल्ल्यात म्हणून आता गप्प बसायला हवं असा त्याचा अर्थ होत नाही," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा विषय सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती
"कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे त्यामुळे हा प्रश्न सोडवला गेलेला नाही. दोन्ही मुख्यमंत्री पंतप्रधानांना आपलं नेता मानतात. पण मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत. त्यांनी महाराष्ट्राचा विषय सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती. कर्नाटक व्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्रशासित करण्याचा ठराव करा आणि केंद्राकडे पाठवावा," अशी मागणी उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दिल्लीत एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असून, ते यावेळी अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मुख्यमंत्री महाराष्ट्रात परतण्याची शक्यता आहे.