कराड - राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप नेते अतुल भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले आहे. एकूण १९ जागांपैकी १४ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर पाच ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार नीलम धनंजय येडगे विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा पराभव केला. मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत असल्याचे पाहायला मिळाले. पण नंतर काँग्रेसच्या बहुतांश उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आणि ती कायम ठेवली.
पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनेल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी होत असलेली ही निवडणूक म्हणजे रंगीत तालीमच समजली जात आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले हे दोघेही कराडमध्ये तळ ठोकून होते. ९ प्रभागांत १९ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. तर नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते.
विजयी उमेदवारांची नावे
प्रभाग क्रमांक १ काँग्रेसच्या गीतांजली पाटील आणि प्रशांत चांदे
प्रभाग क्रमांक २ भाजपच्या नूरजहाँ मुल्ला आणि विक्रम चव्हाण
प्रभाग क्रमांक ३ काँग्रेसचे किशोर एडगे आणि आनंदी शिंदे
प्रभाग क्रमांक ४ काँग्रेसचे राजेंद्र यादव विजयी
प्रभाग क्रमांक ५ काँग्रेसचे कमल आनंदराव कुराडे आणि भाजपच्या भास्कर सोळवंडे