मुंबई : भाऊचा धक्का ते अलिबागजवळील मांडवा या बहुप्रतीक्षित रो-रो सेवेला (Mandwa Ro-Ro service) अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या १५ मार्चपासून या सेवेला प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra chief minister Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत या सेवेची सुरुवात केली जाणार आहे. केंद्र सरकार अंतर्गत मुंबई महानगराला जलवाहतुकीने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नव्या सेवेमुळे रस्त्याने तीन तासांच्या प्रवासाऐवजी ४५ मिनिटे लागणार आहेत.
या प्रकल्पासाठी मुंबईतील भाऊचा धक्का आणि अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे सुसज्ज टर्मिनल आणि जेटी (Mandwa jetty) उभारण्यात आली होती. ही सेवा जून २०१८ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र जलवाहतुकीसाठी बोट उपलब्ध न झाल्याने सेवा रखडली होती. अखेर प्रोटोपोरस नावाची बोट गेल्या महिन्यात मुंबईत दाखल झाली असून, तिच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर रोरो सेवा सुरु होणार. याच महिन्यात ही सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांची मागणी यानिमित्ताने पूर्ण होणार आहे.
तसेच मुंबई ते अलिबाग दरम्यानच्या रस्त्यांच्या कामांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (एमएमबी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन रामास्वामी यांनी सांगितले, आम्ही १५ मार्चपर्यंत या सेवा सुरू करण्याचा विचार करीत आहोत. त्या तारखेला आमची औपचारिक लाँचिंग होईल.
ग्रीसहून आलेल्या एम २ एम १(M2M1 Ship) हे जहाज १४ फेब्रुवारीला मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले आहे. या जहाजात १००० लोकांना चांगल्या हवामानामध्ये आणि ५०० लोकांना खराब हवामानात सामावून घेण्याची क्षमता आहे. या जहाजात सर्व परिस्थितीमध्ये २०० कार सामावून घेण्याची क्षमता देखील आहे. इंधनाची बचत करुन वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी या सेवेची मदत होणार आहे. या जहाजातून प्रवासी त्यांच्या प्रवासासाठी तीन श्रेणीतून निवडू शकतात.