अवकाळी पावसामुळे 'फळांचा राजा' लांबणीवर

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेती भुईसपाट

Updated: Nov 6, 2019, 11:13 AM IST
अवकाळी पावसामुळे 'फळांचा राजा' लांबणीवर  title=

किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : पाऊस लांबल्यानं त्याचा परिणाम कोकणातल्या भातशेतीवर झालाच आहे. मात्र आता आंबा पीकावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस लांबल्यानं आंबा पीक लांबण्याची शक्यता आहे. जवळपास दोन महीने आंबा पीक लांबण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये झाडांना मोहर येतो. मात्र अद्याप अनेक झाडांवर पालवी दिसते. तर काही झाडांना पालवी देखील आलेली नाही. पावसाची स्थिरता अशीच राहिली.तर त्याचा फटका आंबा बागायतदारांना बसणार आहे. 

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेती भुईसपाट झालीये. आता हळू हळू त्याचा फटका शेतीपूरक व्यवसायांनाही बसू लागला आहे. परतीच्या पावसाचा मोठा फटका हा शेतमालावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. भातशेतीसोबतच कांद्याच्या पिकाचंही यामुळे मोठं नुकसान झालं आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून तेजीत असणाऱ्या कांद्याच्या दरांनी पुन्हा एकदा वेग पकडला आहे. सध्याच्या घडीला कांद्याचे दर शंभर रुपये प्रति किलो इतक्यांवर पोहोचले आहेत. मंगळवारी एक किलो कांद्यासाठी ८० रुपये मोजावे लागत होते. हेच दर अवघ्या एका दिवसांत थेट शंभरीच्या घरात पोहोचले आहेत. 

किरकोळ आणि घाऊक बाजारातही कांद्याचे दर लक्षणीयरित्य वाढले आहेत. परतीच्या पावसामुळे नाशिक आणि जुन्नर या कांद्याची निर्यात केल्या जाणाऱ्या ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. ज्याचे पडसाद दरवाढीमध्ये उमटल्याचं दिसत आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं लाखो शेतकऱ्यांचा शेतमाल मातीमोल झाला आहे. आता शेतीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांनाही त्याचा फटका बसू लागला आहे. पावसानं मका, ज्वारी, बाजरी भुईसपाट केली. केवळ धान्यच नाही तर तणसही कुजून गेलं. याचा फटका पशुखाद्यालाही बसला आहे.