हुंडा घेता का? तुमच्या महिला बुरखा घालतात का? नवसासाठी बळी देता का? मराठा सर्वेक्षणात वादग्रस्त प्रश्न

Maratha Aarakshan Survey Objectionable Questions: ही प्रश्नावली अतिशय घाईने व पुरेशी तयारी न करता निश्चित करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. यात वापरलेली मराठी भाषाही फारच चुकीची आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 26, 2024, 08:09 AM IST
हुंडा घेता का? तुमच्या महिला बुरखा घालतात का? नवसासाठी बळी देता का? मराठा सर्वेक्षणात वादग्रस्त प्रश्न title=
मराठा समाज संतापला

Maratha Aarakshan Survey Objectionable Questions: मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्यांबरोबर मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मराठा आंदोलनाची तीव्रता वाढताच आहे. आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 23 जानेवारीपासून मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली वादात सापडली आहे. या प्रश्नावलीमधील काही अतार्किक प्रश्नांवर मराठा समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ‘‘लग्न जुळवताना हुंडा मागता का?, तुमच्याकडे लग्नाचे वय कोणते – 12 ते 15 की 16 ते 18?’’ असे प्रश्न विचारून शासनाला खरंच आमचे मागासलेपण तपासायचे आहे की आम्हाला गुन्हेगार ठरवायचेय, हा अदृश्य कट आहे, असा सवालही मराठा समाजाकडून उपस्थित केला जात आहे.

मराठा समाजाचा आक्षेप

23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. मात्र मराठा समाजाचं मागासलेपण ज्या प्रश्नावलीच्या आधारे तपासले जाणार आहे तिच्यावरच प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत. या प्रश्नावलीमध्ये, ‘‘तुमच्या समाजात विवाहित स्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का?, विधवांना हळदी-कुंकवाला आमंत्रित करतात का?, विधवांना कपाळाला कुंकू लावण्याची, मंगळसूत्र घालण्याची मुभा आहे का?, विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का?,  नवसासाठी कोंबडा/बकऱ्याचा बळी देण्याची पद्धत आहे का?’’, अशा प्रश्नांचा समावेश आहे. या प्रश्नांवर मराठा समाजाचा आक्षेप आहे.

आंतरधर्मीय विवाह झाला आहे का? महिला पडदा/बुरखा वापरतात का?

या प्रश्नावलीतील दोन प्रश्नांवर मराठा समाजातूनच आक्षेप नोंदवले आहेत. त्यातील एका प्रश्नात ‘‘तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरधर्मीय विवाह झाला आहे का?’’ असं विचारण्यात आलं आहे. तर दुसऱ्या प्रश्नात ‘‘तुमच्या समाजात महिला पडदा/बुरखा वापरतात का?’’ असं विचारण्यात आलं आहे. सरकारला या प्रश्नांच्या उत्तरातून नेमके काय शोधायचे आहे. मराठा समाजात बुरखा कोण वापरतो?, ‘बुरखा’ हा विशिष्ट शब्द यात कसा आला? आंतरधर्मीय विवाह झाला असेल तर लग्न करून घरात आलेली वा घरातून गेलेली व्यक्ती कोणत्या धर्माची आहे, हे सरकारला जाणून घ्यायचे आहे का? सरकारचा तसा काही छुपा अजेंडा तर नाही ना? असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. ही प्रश्नावली अतिशय घाईने व पुरेशी तयारी न करता निश्चित करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. यात वापरलेली मराठी भाषाही फारच चुकीची आहे. काही आकडे इंग्रजीत तर प्रश्नांचा क्रम मराठीत आहे. प्रश्नांमध्येही व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत.

अशा बिनडोक प्रश्नावलीतून...

अखिल भारतीय मराठा महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश साळुंखे यांनी या प्रश्नावलीसंदर्भात बोलताना, "प्रश्नावलीतील काही प्रश्न अतिशय अतार्किक आहेत. हो, मी हुंडा घेतो, असे कोण म्हणणार आहे? मुळात या सर्वेक्षणातून सरकारची विवशताच उघड झाली आहे. मराठे आता जुमानणार नाहीत, याचा अंदाज आल्याने सरकारने अतिशय घाईगडबडीत सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. तो केवळ उपचारापुरता असेल तर अशा बिनडोक प्रश्नावलीतून काहीच हाती लागणार नाही," असं म्हटलं आहे.