close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मराठा आणि धनगर समजातर्फे पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचा सत्कार, १ वर्षात असं बदललं चित्र

एक वर्षात मुख्यमंत्र्यांच्या करिष्म्यामुळे सर्वच चित्र बदलेलं दिसत आहे.

Updated: Jul 11, 2019, 03:54 PM IST
मराठा आणि धनगर समजातर्फे पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचा सत्कार, १ वर्षात असं बदललं चित्र

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा संघटना आणि धनगर समजातर्फे पंढरपूरमध्ये सत्कार होणार आहे. गेल्या वर्षी तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये शासकीय पूजा देखील झाली नव्हती. आता एक वर्षात मुख्यमंत्र्यांच्या करिष्म्यामुळे सर्वच चित्र बदलेलं दिसत आहे.

मुख्यमंत्री म्हणून सध्याच्या सरकारमधील देवेंद्र फडणवीस यांची पंढपूरमधील विठ्ठलाची पूजा ही शेवटची शासकीय पूजा ठरली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर यानिमित्तानं काही योग जुळवून आणले जात आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती ही युती आणखी घट्ट करणारी आहे, यात शंका नाही. त्यातच मराठा संघटना आणि धनगर समाजातर्फे पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा सत्कार हाही एक मोठा योगयोग ठरणार आहे. या सर्व घटना म्हणजे एका वर्षात परिस्थिती किती आणि कशी बदलली हेच दाखवून देत आहे.

गेल्या वर्षी मराठा संघटनांच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या विठोबाची शासकीय पूजा देखील करता आली नव्हती. आरक्षणला विलंब होत असल्यानं मराठा समाजात मोठा रोष होता. त्यातच विरोधी पक्षापेक्षा शिवसनेने टीकेच्या तोफा डागत भाजपला हैराण करुन सोडले होते. भाजप काय मुख्यमंत्री सुद्धा बॅकफुटवर गेल्याचं चित्र होतं. 

आता एका वर्षात चित्रच पूर्णपणे बदलेलं आहे. उच्च न्यायालयात राज्य सरकारने घेतलेला मराठा आरक्षण संदर्भातला निर्णय़ हा टिकला, न्यायालयाने हे आरक्षण मान्य केलं. तर याआधीच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती राज्य सरकारने दिल्या होत्या. एकंदरितच राज्य सरकारविरोधात खास करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजात असलेलं विरोधाचं वातावरण आता पूर्णपणे निवळलं आहे.

गेल्या वर्षापासूनच लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती होणार नसल्याचं चित्र स्पष्ट होतं. मात्र फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री यांनी जादूची काडी फिरवली, मातोश्री वारी केली आणि शिवसेना भाजपची युती झाल्याचं जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. वेळीच युती केल्याचा मोठा फायदा मुख्यमंत्र्याना झाला. कारण राज्यात निवडणुकीत पूर्वीच्याच खासदारांचं संख्याबळ राखण्यात ते यशस्वी ठरले. आता लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या आकडेमोडीला सुरुवातही झाली आहे. 

त्यातच गेल्या ऑक्टोबर महिन्यांतच राज्यात दुष्काळ जाहीर करत दुष्काळासाठीच्या उपाययोजना राबवत राज्यात रोष वाढणार नाही याची खबरदारी मुख्यमंत्री यांनी घेतली, ज्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत झाला.   

तेव्हा पंढरपुरातील घडामोडी हेच सांगत आहे की एका वर्षात परिस्थिती कशी बदलली आहे. मुख्यमंत्री सध्या फॉर्मात असून विरोधकांची स्थिती बघता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीचा मोठा विजय हा एक सोपस्कार राहिल्याचं चित्र आहे.