Maratha Reservation : मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चाचा मार्ग बदलला; आंदोलकांमध्ये नाराजी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात मराठा समाजाच्या वतीनं आंदोलनांची वाट निवडलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.   

सायली पाटील | Updated: Jan 25, 2024, 07:23 AM IST
Maratha Reservation : मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चाचा मार्ग बदलला; आंदोलकांमध्ये नाराजी  title=
Maratha Reservation ralley route changed latest update on manoj jarange protest latest news

Maratha Reservation News : पिंपरी चिंचवड मध्ये जरांगे पाटील यांचं उत्साहात स्वागत झाल्यानंतर लोणावळ्यातील सभेला जाण्यापूर्वी पिंपरी चिंचवडच्या चौका चौकामध्ये मराठा बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत फुलांची उधळण करत एक लाख मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. सध्या लाखो मराठा समर्थकांच्या साथीनं मनोज जरांगे लोणावळ्यात दाखल झाले असून, 26 जानेवारीला हा मोर्चा मुंबईत दाखल होणार असून, त्याआधी मात्र मराठा आंदोलकांनी नाराजीचा सूर आळवला आहे. 

काय आहे आंदोलकांच्या नाराजीमागचं कारण? 

मराठा आंदोलक मुंबईत दाखल होण्याचा पूर्वनियोजित मार्ग बदलण्यात आला असून आता एक्‍सप्रेस वे ऐवजी जुन्‍या मुंबई पुणे हायवेने येण्‍याच्‍या सूचना आंदोलकांना देण्यात आल्या आहेत. ज्यामुळं मराठा आंदोलकांमध्‍ये नाराजी पाहायला मिळत आहे. 

मुंबईत आंदोलनासाठी निघालेले मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांच्या पदयात्रेचा मार्ग बदलल्‍याने आंदोलकांमध्‍ये नाराजीचा सूर आहे. मराठा आंदोलकांना (Mumbai Pune Expressway) मुंबई पुणे एक्‍सप्रेस वे ऐवजी (Old Mumbai Pune Highway) जुन्‍या मुंबई पुणे हायवेने बोरघाटातून येण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. 

अचानक मार्ग बदलल्‍याने खोपोलीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जुन्‍या महामार्गावर बोरघाटात अपघाताची शक्‍यता आहे. जुना महामार्ग अरूंद असल्‍याने खोपोली शहर आणि परीसरात प्रचंड वाहूतक कोंडी होण्‍याचीही भीती व्‍यक्‍त होत आहे. ज्यामुळं आता अखेरच्या क्षणी करण्यात आलेल्या या बदलांमुळं आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जरांगे पाटील 26 जानेवारीला मुंबईत पोहोचू नये अशी तर सरकारची भूमिका नाही ना?, अशी शंका आंदोलक व्‍यक्‍त करत आहेत. 

हेसुद्धा वाचा : तब्बल 12 तास ED चौकशी झाल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

 

दरम्यान, मराठा आंदोलक जुन्‍या हायवेने जाणार असल्‍यामुळं खोपोलीतील काही शाळांनी सुटी जाहीर करण्यात आली आहे. सदर परिस्थितीमध्ये आंदोलकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या 26 जानेवारीपासून होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय पक्षांच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांना 149 ची नोटीस आली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांची प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली आहे.