साकोरी मालेगाव (नाशिक) : येथील सुपुत्र शहीद जवान सचिन मोरे यांना अखेरची सलामी देण्यात आली. सैन्यदलाच्या १४ सशस्त्र जवानांनी ही सलामी दिली. त्यानंतर मानाचा तिरंगा ,सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शहीद सचिन यांची पत्नी सारिका यांच्याकडे सुपूर्त केला. वीरमाता जिजाबाई, वीरपत्नी सारिका, लहानग्या दोन्ही मुली, यांनी या तिरंग्याचा स्वीकार केला. जवान सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सचिन मोरे यांच्या पार्थिवाला पुतण्या हर्षलकडून मुखाग्नी देण्यात आला. पंचक्रोशीतील नागरिकांनी अमर रहे..अमर रहे..सचिन मोरे अमर रहे..अशा जयघोषात आपल्या लाडक्या भूमिपूत्राला साश्रूनयनांनी आणि जड अंत:करणाने अखेरचा निरोप दिला.
साकोरी मालेगाव । सैन्यदलाच्या १४ सशस्त्र जवानांनी दिली शहीद जवान सचिन मोरे यांना अखेरची सलामी । मानाचा तिरंगा, सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शहीद सचिन यांची पत्नी सारिकाला केला सुपूर्त। वीर माता जिजाबाई,वीर पत्नी सारिका, लहानग्या दोन्ही मुली, यांनी केला स्वीकार#Nashik @ashish_jadhao pic.twitter.com/eB1pwBex1O
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 27, 2020
शोकाकुल वातावरणात शहीद सचिन मोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शाश्रु नयनांनी शहिद सचिन मोरे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी निरोप देण्यासाठी हजारो जनसमुदाय उपस्थित होता. पालकमंत्री छगन भुजबळ,कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्य सरकारच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य सरकार या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगत राज्य सरकारच्यावतीने भुजबळ यांनी आश्वासन दिले.
पूर्व लडाखच्या सीमेवरुन भारत-चीनमध्ये संघर्ष वाढल्याने तणावात भर पडली होती. यावेळी गलवान खोऱ्यात चीन सैन्यांकडून हिंसक झडप घालण्यात आली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. दरम्यान, गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले होते. गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात भारतीय लष्करातील दोन जवान पाण्यात पडले. ते वाहून जात असताना त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न जवान सचिन मोरे यांनी केला होता.
जवान सचिन मोरे यांचे पार्थिव गावात दाखल । चीन सीमेवर कर्तव्य बजावत असतांना वीरगती प्राप्त झालेले जवान सचिन मोरे यांच्यावर मालेगांवच्या साकुरी या मूळ गावी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेतhttps://t.co/kpo9phlA1j@ashish_jadhao pic.twitter.com/qGQERky6AG
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 27, 2020
शहीद सचिन मोरे यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे काल शुक्रवार २६ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजता पोहचल्यानंतर त्यांचे पार्थिव तेथून त्यांच्या मुळगावी साकुरी (झाप) येथे आणण्यात आल्यानंतर गावकऱ्यांना हुंदका अनावर झाला. मोरे यांच्या गावातील घराजवळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.शाहिद सचिन मोरे यांचे पार्थिव पुण्यावरून मालेगांव तालुक्यात येताच रस्त्यावरील सर्वच गावांमध्ये सचिन मोरे यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीत तिरंग्यात लपटलेले पार्थिव गावातील प्रमुख रस्त्यावरून साकुरीच्या मोरे वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात नेण्यात आले. रस्त्यावर श्रध्दांजलीपर रांगोळी काढण्यात आली होती. पार्थिव जात असताना नागरिक घरासमोरून अंत्यदर्शन घेत होते. पार्थिव साकुरी येथील जिल्हा परिषद शाळेजवळील प्रांगणात नेण्यात आले.