#MeToo कृष्णकृत्य उजेडात येऊ नये म्हणून प्राध्यापकानं विद्यार्थीनींचे गुण वाढवले!

जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. सुधीर भटकर यांची एकतर्फी प्रेमकथा सध्या चर्चेत आलीय

Updated: Jul 11, 2019, 09:22 PM IST
#MeToo कृष्णकृत्य उजेडात येऊ नये म्हणून प्राध्यापकानं विद्यार्थीनींचे गुण वाढवले!

विकास भदाणे, झी २४ तास, जळगाव : जळगावातील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पत्रकारिता विभागात एक चक्रावून टाकणारी घटना समोर आलीय. प्रा. सुधीर भटकर या प्राध्यापकानं आपल्या 'मी टू प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी प्राध्यापक महाशयांनी अजब उपाय शोधून काढला. आपली कृत्यं उजेडात येऊ नये म्हणून पीडित तीन मुलींच्या गुणांत वाढ केल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने केलीय. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडालीय. कुलगुरूंनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली असून या समितीच्या निर्णयावर भटकर यांच्यावर कारवाई अवलंबून आहे. 

जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. सुधीर भटकर यांची एकतर्फी प्रेमकथा सध्या चर्चेत आलीय. काही महिन्यांपूर्वी प्राध्यापक भटकर यांचं वर्गातल्या विद्यार्थिनीशी एकतर्फी प्रेम जडलं. वयाची पन्नाशी गाठलेल्या भटकर यांनी आपल्या प्रेमभावना संबंधित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीकडे शेअर केल्या. भटकर यांच्या या सगळ्या प्रेमभावना एका विद्यार्थिनीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केल्या. 

भटकर यांचं हे एकतर्फी प्रेमप्रकरण अनेक महिने चालत राहिलं. या सगळ्याला वर्गातल्या अन्य विद्यार्थिनीही वैतागल्या होत्या. काही विद्यार्थिनींनी भटकर यांच्या दालनात जाऊन बराच गोंधळ घातल्याचंही बोललं जातंय. अखेर विद्यार्थिनींचे गुण वाढवून या प्रकरणावर पडदा पाडण्याचं ठरलं. मात्र यात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. अखेर एका विद्यार्थ्याने कुलगुरुंकडे याबाबत लेखी तक्रार केली आणि सगळं बिंग फुटलं. 

काही वर्षांपूर्वी विद्यापीठाचे बनावट पीएचडी प्रकरण देशभर गाजलं होतं. त्यानंतर पेपरफुटी प्रकरण, परदेशी विद्यार्थिनीला वसतिगृहात प्रवेश दिल्याचं प्रकरण अशा एक ना अनेक प्रकरणांनी नेहमी वादात असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नाव या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बदनाम झालंय.