म्हाडाची खुशखबर : ३१३९ घरांसाठी सोडत

यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. 

Updated: May 19, 2018, 07:09 PM IST
म्हाडाची खुशखबर : ३१३९ घरांसाठी सोडत  title=

मुंबई : म्हाडाच्या घरांची वाट पाहणाऱ्या अनेक नागरिकांसाठी म्हाडानं एक खुशखबर दिलीय. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) पुणे विभागातील विविध वसाहतीतील ३१३९ सदनिका व २९ भूखंडांच्या विक्रीसाठी https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्जदारांच्या नोंदणीला आजपासून प्रारंभ झाला आहे. दि. १८ जून २०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सदर नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी २० मे रोजी दुपारी २ ते दि. १९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. 

आय. टी. इनक्युबेशन सेंटर, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे येथे दि. ३० जून २०१८ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी पुणे मंडळातर्फे   यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS  द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.  डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे २० मे दुपारी २  ते १९ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कालावधी ही रक्कम भरता येईल. 

उत्पन्नाची मर्यादा

यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. 

- अत्यल्प उत्पन्न गटाकरिता दि. ०१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत असावे

- अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,००० पर्यंत 

- तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे रु. ७५,००१ वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे

अनामत रक्कम

ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. ५,४४८/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. १०,४४८ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. १५,४४८ प्रति अर्ज,  उच्च उत्पन्न  गटाकरिता रु. २०,४४८ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज  रु. ४४८ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.

कुठे आहेत या सदनिका 

यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी सेक्टर ५ ए-ब, नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे) व महाळुंगे टप्पा-१ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण ४४९ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता  महाळुंगे टप्पा-२ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) गोपाळपूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर), मोरेवाडी (कोल्हापूर), बार्शी (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), तळेगांव दाभाडे (पुणे), सदर बाजार (सातारा), सासवड(ता. पुरंदर, जि. पुणे), दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे), हडपसर (पुणे), रावेत (पुणे), नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे), चिखली -मोशी (पुणे), पिंपरी (पुणे), चिखली, चऱ्होली बु., कात्रज, धानोरी, आळंदी रोड, वाकड, येवलेवाडी (ता. हवेली, जि. पुणे),मौजे वडमुखवाडी, शिवाजी नगर (सोलापूर), डुडुळगाव  येथील २४०४ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता  सुभाष नगर (कोल्हापूर), सासवड, खराडी, शिवाजीनगर (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), पिंपरी, महाळुंगे टप्पा-१ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण २८२ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता पिंपरी (पुणे) येथील एकूण ४ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. 

अल्प उत्पन्न गटाकरिता क्षेत्र माहुली (जि. सातारा) बार्शी (जि. सोलापूर), भोर (जि. पुणे), दहिवडी (ता. माण, जि. सातारा), बनवडी (ता. कराड, जि. सातारा), शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा), अक्कलकोट (जि. सोलापूर),  वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता  बार्शी (जि. सोलापूर), क्षेत्र माहुली (जि. सातारा), दहिवडी (ता. माण, जि. सातारा) तर  उच्च  उत्पन्न गटाकरिता  वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा)  येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे.                    
     
सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही म्हाडाने प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास पुणे मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x