सांगलीत दूध आणि भाजी विक्रेत्यांकडून पूरग्रस्तांची लूट

पूरपरिस्थितीचा फायदा उचलत अनेक चोरट्यांनी बंद घरांवर आपला हात साफ केला आहे.

Updated: Aug 10, 2019, 01:31 PM IST
सांगलीत दूध आणि भाजी विक्रेत्यांकडून पूरग्रस्तांची लूट title=

सांगली: गेल्या सहा दिवसांपासून सांगलीत उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दूध, पाणी, भाजीपाला आणि पेट्रोलची तीव्र टंचाई जाणवत आहे. दूध आणि पेट्रोल, पाणी घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे. भाजी, दूध विक्रेते या परिस्थितीचा फायदा उचलत अव्वाच्या सव्वा दर उकळत ग्राहकांची लूट करत आहेत. 

महापुराने अर्ध्यापेक्षा अधिक सांगली जलमय झाली आहे. व्यापारपेठेत पाणी शिरल्याने व्यापार्‍यांचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे चहुकडे पाणीच पाणी आहे. रस्त्यावर पाणी असल्याने दूध, फळे, भाजीपाला, पेट्रोल, डिझेलची वाहतूक ठप्प झाली आहे. पूरपरिस्थितीचा फायदा उचलत अनेक चोरट्यांनी बंद घरांवर आपला हात साफ केला आहे.

घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी चोरी केली आहे. काही ठिकाणच्या पेट्रोलपंपावरील पेट्रोल, डिझेल संपले आहे तर शिल्लक असणार्‍या पंपावर वाहनधारकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

त्याचप्रमाणे महापालिकेकडून पाणी पुरवठा होणार नसल्याने अनेक ठिकाणी असणार्‍या पेयजल केंद्रावर पाणी घेण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. चोरीची शक्यता लक्षात घेता काहींनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. महापुराच्या पाण्याच्या विळख्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कर, एनडीआरएफ यांच्यासोबतच महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि सामाजिक संघटनांसोबत असंख्य युवक मदतकार्यात गुंतले आहेत. चौथ्या दिवशीही पुराचा विळखा कायम होता. पुराचे पाणी बघायला येणार्‍यांना शिस्त लावण्याचे काम नागरिक स्वयंस्फुर्तीने करीत होते.