अमित शाहांना भाजपामधूनच विरोध? राऊत शंका व्यक्त करत म्हणाले, 'मोदी खलनायक ठरले ते याच..'

Sanjay Raut On Amit Shah Future In BJP: अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धडा घ्यावा असा हा निकाल, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी फडणवीसांचाही उल्लेख केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 9, 2024, 07:53 AM IST
अमित शाहांना भाजपामधूनच विरोध? राऊत शंका व्यक्त करत म्हणाले, 'मोदी खलनायक ठरले ते याच..' title=
राऊत यांनी लेखातून व्यक्त केली शंका

Sanjay Raut On Amit Shah Future In BJP: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी नवी दिल्लीत आयोजित शपथविधी सोहळ्यामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. चंद्रबाबू नायडूंच्या तेलगू देसम पार्टी आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडच्या मदतीने भारतीय जनता पार्टीला यंदा केंद्रात आघाडीचं सरकार स्थापन करावं लागणार आहे. त्यामुळेच आता कोणती मंत्री पदं कोणाकडे जाणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींबरोबरच भाजपावरही टीकास्र सोडलं आहे. विशेष म्हणजे मोदींच्या मंत्रीमंडळात आतापर्यंत केंद्रीय गृहमंत्रालय संभाळणारे अमित शाहा असतील की नाही याबद्दलही राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे.

हा पराभव नाही तर काय?

एक्झिट पोलचे सर्व अंदाज चुकल्याचा उल्लेख राऊत यांनी 'सामना'मध्ये रोखठोक सदराअंतर्गत लिहिलेल्या लेखात केला आहे. "इंडिया आघाडीस 234 जागा मिळाल्या. 125 जागाही या सगळ्यांना मिळून जिंकता येणार नाहीत अशी भाषा मोदी करीत होते. त्या इंडियाने मोदींचे बहुमताचे पंखच कापले व त्यांना जमिनीवर आणले. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमुळे मोदींचे स्वप्न भंगले. अखिलेश यादव यांनी श्रीरामाच्या भूमीतच मोदींना रोखले. 80 पैकी 42 जागा अखिलेश व राहुल यांच्या युतीने जिंकल्या. अयोध्या असलेले फैजाबाद व रामभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान असलेले ‘चित्रकूट’ या दोन्ही ठिकाणी मोदी-भाजपचा पराभव जनतेने केला. मोदी हे काशीचे नरेश असल्याच्या आविर्भावात वावरतात. त्या काशीतच मतदारांनी मोदींचा नैतिक पराभव केला. पाच लाखांचे मताधिक्य जेमतेम दीड लाखावर आले. हा पराभव नाही तर काय?" असा सवाल राऊत यांनी केला आहे.

मोदींचे खोटे बोलणे, खोटे रडणे, खोटे हसणे या सगळ्याला जनता कंटाळली

"स्वत:ला देवत्व बहाल करून लोकांना भोंदू बनवणाऱ्यांचा खेळ त्यामुळे काशीतच आटोपला. रामाचा व्यापार गेल्या दहा वर्षांत झाला. तो रामाच्या नगरीतच प्रत्यक्ष श्रीरामाने बंद पाडला. मोदी यांच्या काळात वाराणसीचे गुजरात झाले. येथील व्यापार, उद्योगाच्या सर्व नाड्या गुजराती व्यापाऱ्यांकडे गेल्या. रस्ते, हॉटेल्सचे ठेके फक्त गुजरात्यांकडे पद्धतशीर गेले. वाराणसीच्या मतदारांनी या भोंदूगिरीचा बदला घेतला. मोदी यांचा राजकीय अवतार त्यामुळे संपल्यातच जमा आहे. त्यांचे खोटे बोलणे, खोटे रडणे, खोटे हसणे या सगळ्यात जनता कंटाळली व लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पायाखालची बहुमताची सतरंजीच ओढली हे सत्य आहे," असं राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> 'भाजपने मोदींना सहन करू नये, असा आवाज महाराष्ट्रातच..'; शपथविधी आधीच राऊतांचं विधान

अनेक केंद्रीय मंत्र्यांना मतदारांनी नाकारले

मोदींच्या मंत्रीमंडळातील अनेक केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाल्याकडेही राऊत यांनी लक्ष वेधलं आहे. "मोदी सरकारातील 17 मंत्र्यांचा दारुण पराभव झाला. यात स्मृती इराणी आहेत. अमेठीत राहुल गांधी यांचा ‘पीए’ के. एल. शर्मा यांनी हा पराभव केला. महाराष्ट्रात रावसाहेब दानवे, भारती पवार व कपिल पाटील हे तीन मंत्री लोकांनी आपटले. उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने मुंबईत उभे केले व काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना पाडले. प्रकाश आंबेडकर स्वत: अकोल्यात पराभूत झाले. भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करू पाहणारे नेते व त्यांचे पक्ष या निवडणुकीत लोकांनी फेकून दिले. उत्तर प्रदेशात मायावतींचे राजकारणच संपले असा निकाल लोकांनी दिला. जेथे मोदी-शहांनाच लोकांनी झिडकारले तेथे इतरांचे काय?" असं राऊत म्हणाले आहेत.

मोदींना कुबड्या घेऊन राष्ट्रपती भवनात जावं लागेल

"महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून देवेंद्र फडणवीसांचे ‘मी परत येईन’ नाटक बंद पाडले. अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धडा घ्यावा असा हा निकाल. मोदी पुन्हा शपथ घेतील, पण त्यांना कुबड्या घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल. या नव्या रचनेत अमित शहांकडे गृहखाते राहील काय? नरेंद्र मोदी लोकांच्या दृष्टीने खलनायक ठरले, त्यांचे नुकसान झाले ते याच गृहखात्याच्या गैरवापराने. भविष्यात अमित शहांविरोधात पक्षातच आवाज उठेल असे चित्र आहे," अशी शक्यता राऊत यांनी व्यक्त केली आहे.