गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : सध्या हिंगोलीत आधी वानरांची आणि वानरांमुळे नंतर माणसांची अशी भागमभाग सुरू आहे. त्याचं झालंय असं की रानावनात जिथे माकडांचा मुक्काम असायचा, तिथलं पाणी आता ,संपलंय. त्यामुळे या वानरांच्या टोळीनं शहराकडे मोर्चा वळवलाय.हिंगोलीत दुकानांमध्ये, घरांच्या कौलांवर, कारखान्यांमध्ये या माकडांनी मुक्काम ठोकलाय... कधीकधी ही वानरं रस्ताही अडवतात. ही माकडं पहिल्यांदा जेव्हा वस्तीत घुसली, तेव्हा लोकांनी कौतुकानं त्यांना शेंगदाणे, फुटाणे दिले.... त्यामुळे पाहुणचारानं सुखावलेली ही माकडं आता इथून मुक्काम हलवायलाच तयार नाहीत.
आता शहरात स्थिरावलेल्या या वानरांची हिम्मत चांगलीच वाढलीय.... ते कधी वाळत घातलेले कपडे पळवतात, वाळवणासाठी ठेवलेल्या पदार्थांवर ताव मारतात, स्वयंपाकघरात घुसून भाजी-भाकरी पळवतात, हॉटेलमध्ये शिरुन भजी हिसकावून घेतात... असा उच्छाद वानरांनी मांडलाय. फावल्या वेळात ही माकडं घराच्या छतांवरुन उड्या मारतात... कहर म्हणजे शहरात आलेल्या या वानरांच्या दोन टोळ्या तयार झाल्यायत... या टोळ्या सारख्या एकमेकांशी भांडतात... त्यात नागरिकांच्या वस्तूंचं आणि छपराचं नुकसान होतंय.