Monsoon Weather in Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसल्या होत्या. मात्र, आज 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, मान्सून महाराष्ट्र कधी व्यापणार तसंच, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी, याची माहितीही होसाळीकर यांनी दिली आहे.
दुष्काळात होरपळत असलेला महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो मान्सून राज्यात दाखल झाला आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसंच, तळकोकणात प्रवेश केलेला मान्सून पुढील तीन-चार दिवसात आणखी पुढे सरकणार आहे. येत्या 15 जून पर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, अशी माहिती डॉ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
15 जूनपर्यंत जरी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असेल तरीदेखील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. राज्यात पाऊस बऱ्यापैकी स्थिरावल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
वर्ध्याच्या सेलू,देवळी,समुद्रपूर,वर्धा तालुक्यात पावसाची हजेरी. मान्सूनच्या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पहिल्या पावसाने धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशीला मदत झाली आहे.
वाशिम जिल्ह्यातील मानोरा व कारंजा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वळवाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे वातावरण गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैरण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. वळवाचा पावसामुळे खरीपाच्या पेरणीपूर्वीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. मान्सून लवकरच दाखल होणार असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.