तारापूर एमआयडीसीतील स्फोटात सासू-सूनेने गमवला जीव

 ए. एन. के. फार्मा कंपनीत शनिवारी भीषण स्फोट झाला होता.

Updated: Jan 12, 2020, 04:46 PM IST
तारापूर एमआयडीसीतील स्फोटात सासू-सूनेने गमवला जीव title=

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : पालघर जिल्हयातील तारापूर एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी आहेत. ए. एन. के. फार्मा कंपनीत शनिवारी झालेल्या स्फोटात सिंग कुटुंबातील सासू-सुनेचा मृत्यू झाला. त्यामुळं सिंग कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे.

मूळचे बिहारी असलेले वशिष्ठ सिंग हे तारापूरच्या ए एन के फार्मा कंपनीत ट्रान्सपोर्टचं काम करतात. त्यांचा मुलगा आणि कुटुंबियही कंपनीत कामाला असल्यानं गेल्या १५ वर्षांपासून ते तिथंच राहतात. शनिवारी सायंकाळी रिअॅक्टरचा स्फोट झाला आणि त्यात सिंग यांची पत्नी आणि सून निशू राहुल सिंग यांचा दुर्दैवा मृत्यू झाला. वशिष्ट सिंग आणि राहुल सिंग स्फोट झाला तेव्हा कंपनी आवाराबाहेर होते. त्यामुळं ते बचावले.

या दुर्घटनेत वशिष्ठ सिंग यांच्या प्राची आणि ऋतिका या दोन नातीही किरकोळ जखमी झाल्या. मात्र आईचं छत्र हरपल्यानं त्यांच्यावर आभाळ कोसळलं आहे. दरम्यान, फार्मा कंपनीत सुरू असलेलं बचावकार्य आता एनडीआरएफनं थांबवलं आहे.

दरम्यान या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य देण्यात यावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.