समृद्धी महामार्ग चालकांची झोप उडवण्यासाठी MSRDC ची जबरदस्त आयडिया; अपघात रोखण्यास मदत होणार

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर बस आणि कारचे टायर तपासले जात आहेत. 

Updated: Jul 6, 2023, 12:03 AM IST
समृद्धी महामार्ग चालकांची झोप उडवण्यासाठी MSRDC ची जबरदस्त आयडिया; अपघात रोखण्यास मदत होणार title=

Samruddhi Mahamarg Accidents:  समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्याने अनेकांचे जीव घेतले आहेत. येथे होणारे अपघात चिंतेची बाब बनली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी  MSRDC उपाययोजन करत आहेत. समृद्धी महामार्ग रम्बल स्ट्रीप्स बसवण्यात येत आहेत. यामुळे अपघात रोखण्यास मदत होणार आहे. 

चालकांची झोप उडणार

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रम्बल स्ट्रीप्स बसवण्यात येत आहे. चालकांची झोप उडवण्यासाठी एमएसआरडीसीने प्रत्येक 25 किलोमीटरवर हे रम्बल स्ट्रीप्स बसविण्याचे काम सुरू केले आहे. गंगापूर, वैजापूर तालुक्याच्या हद्दीत हे काम सुरू झाले आहे. रात्री पुलावरील कठडे दिसावेत म्हणून रेडियम स्ट्रिपही लावण्यात येत आहे. तर महामार्गावर वाहनं कशी चालवावी यावर टोल नाक्यावर चालकांना ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सूचना देण्यात येणार आहेत.

समृद्धी महामार्गावरील वाहन चालकांचे समुपदेशन

बुलढाण्याच्या अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तर, बसेसची तपासणी करूनच समृद्धीवर प्रवेश मिळणार आहे. वाहनांचा फिटनेस चेक केल्यानंतर सुरक्षेच्या गोष्टी देखील यामध्ये तपासल्या जाणार आहेत. वाहनांचा मर्यादेपेक्षा जास्त वेग असल्यास कॉम्प्युटरद्वारे अर्लाम वाजणार आहे. 

समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात का होतात?

समृद्धीवर सर्वाधिक अपघात ‘महामार्ग संमोहन’मुळे होत असल्याचा निष्कर्ष ‘व्हीएनआयटी’ विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून आलाय. समृद्धीवर सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता वाढली आहे. अपघाताची कारणं शोधण्यासाठी नागपूरच्या ‘व्हीएनआयटी’ संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या ट्रान्सपोर्टेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर तीन महिने नागपूरहून १०० किलोमीटर परिसरात अभ्यास केला. त्यात समृद्धीवरील अपघातासाठी ‘महामार्ग संमोहन’ जबाबदार असल्याचे निरीक्षणातून पुढे आले आहे. कोणत्याही अडथळ्याविना महामार्गावर सरळ रेषेत गाडी एकाच वेगात अनेक मिनिटं धावते तेव्हा मेंदूही क्रिय़ेच्या प्रक्रियेसाठी सक्रीय नसतो. त्याला महामार्ग संमोहन म्हणतात.