लाडकी बहीण योजनेचे पैसे गेले भावाच्या बँक खात्यात, रक्षाबंधन आधीच मोठा गोंधळ

Ladki Bahin Yojana:  15 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवातदेखील झाली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 17, 2024, 10:31 AM IST
लाडकी बहीण योजनेचे पैसे गेले भावाच्या बँक खात्यात, रक्षाबंधन आधीच मोठा गोंधळ title=
लाडकी बहीण योजनेचे पैसे भावाच्या खात्यात (फोटो सौजन्य-AI)

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. 15 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवातदेखील झाली आहे. अनेक महिलांना याचा लाभ घेता आला नाही. तर काहींचे अर्ज बाद झाले आहेत. दरम्यान काही ठिकाणी योजना राबवताना गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे.

तरुणाच्या खात्यात पैसे

लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला नारी शक्ती अॅपवरुन अर्ज भरत आहेत. अंगणवाडी सेविकांकडूनदेखील अर्ज भरुन घेतले जात आहेत. ज्यांचे अर्ज स्वीकारले जात आहेत, त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. पण कोणताही अर्ज न करता एका तरुणाच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे पाहायला मिळाले. राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलीय. या योजनेचा लाभ चक्क एका भावाला झाल्याचा प्रकार यवतमाळमध्ये उघड झालाय. यवतमाळच्या आर्णी इथल्या जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत.

चौकशीची मागणी

विशेष म्हणजे  जाफर शेख याने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केला नव्हता. तरीही त्याच्या  बँक ऑफ बडोदाच्या खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये शासनाने जमा केलेत. आता या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी जाफर यांनी केलीय.

लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का? विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला काय वाटतं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली असताना झी 24 तासने लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा AI सर्व्हे केला. पहिली मराठी AI अँकर झीनिया हा सर्व्हे जाहीर केला. हा सर्व्हे आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करून करण्यात आला. यामध्ये डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करुन हा सर्व्हे तयार केला गेला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सर्व्हे करण्यात आला असून यामध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का? यांचा अंदाज घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. मात्र, लाडकी बहीण योजने संदर्भात विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर झी 24 तासने मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. यामध्ये 55 टक्के लोकांना वाटते की लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल. तर 30 टक्के लोकांना वाटते की लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार नाही. तसेच 15 टक्के लोकांनी यावर आपले मत व्यक्त केले नाही. 

काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना? 

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर 28 जून रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये अर्थसहाय्य राज्य सरकार तर्फे देण्यात येणार आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच अविवाहित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बुधवारी 35 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यानंतर आता 1.25 कोटी महिलांच्या खात्यात महिन्याअखेर पैसे जमा होण्याची शक्यता आहे.