मुंबईः पीटीचा तास सुरू असतानाच खाली कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच...

Mumbai News Today: मुंबईतील शाळेत एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 12, 2023, 12:04 PM IST
मुंबईः पीटीचा तास सुरू असतानाच खाली कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच...  title=
Mumbai News Today 13 year old boy dies at Mumbai kandivali school

Mumbai News: शाळेत पीटीचा क्लास सुरू असतानाच एका 13 वर्षीय विद्यार्थ्यावर अचानक मृत्यू ओढावला आहे. कांदिवली येथील शाळेत हा प्रकार घडला असून मुलाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला, हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. हा शाळकरी मुलगा मुळचा गुजरातचा असून शिक्षणासाठी म्हणून तो मुंबईत आला होता. कांदिवली येथे तो हॉस्टेलमध्ये राहत होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, ओम सचिन गंडेचा असं या मुलाचे नाव असून तो आरजे मखिजा शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला डेंग्यू झाला होता. मात्र, त्यातून तो बरा देखील झाला होता. सोमवारी शाळेत पीटीचा क्लास सुरु असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो मैदानातच खाली कोसळला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना याबाबत माहिती दिली. 

ओम मैदानातच खाली कोसळल्यानंतर शिक्षकांनी त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. मात्र तरीही त्याच्याकडून काहीच हालचाल जाणवली नाही. त्यानंतर त्याला लगेचच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नंतर त्याला बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलवण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले. 10.15 मिनिटांनी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शाळेकडून त्याच्या पालकांना कळवण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील पीटीचे शिक्षक आणि ओमच्या वडिलांचा जबाब घेण्यात आला आहे. तूर्तास अपघाती मृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तर, मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचे रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. असं पोलिसांनी म्हटलं आहे. 

ओमचे पीटीचे शिक्षक संतोष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर रोजी शाळेच्या पटांगणात पीटीचा तास घेत होतो. त्यावेळी सर्व विद्यार्थी झाडाखाली बसले होते. तेव्हा अचानक ओमला अस्वस्थ वाटू लागले आणि तो बेशुद्ध झाला. आम्ही सुरुवातीला त्याला पाणी मारुन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर आम्ही त्याला लगेचच कांदिवलीतील रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

पोलिसांच्या माहितीनुसार, ओमला दहा दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. पण त्यातून बरा झाला होता व नियमित शाळेतही जावू लागला होता. ओमचे पालक गुजरात येथे राहतात. ओमच्या मृत्यूची माहिती त्याना देण्यात आल्यानंतर ते लगेचच मुंबईत दाखल झाले होते. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह पालकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. तसंच, अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.