आता बोरीवलीहून थेट कोकणात जा; आजपासून सुरू होतेय नवीन एक्स्प्रेस, 'या' शहरांत असणार थांबा

Madgaon Bandra Express: पश्चिम रेल्वेवरुन लवकरच कोकणात जाणारी ट्रेन सुटणार आहे. आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 29, 2024, 09:08 AM IST
आता बोरीवलीहून थेट कोकणात जा; आजपासून सुरू होतेय नवीन एक्स्प्रेस, 'या' शहरांत असणार थांबा title=
Mumbai news Western Railway To Launch Bi-Weekly Express Service Piyush Goyal to flag off Madgaon Bandra Express On August 29

Madgaon Bandra Express: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. या काळात रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळणे खूप कठिण असते. मात्र आता रेल्वे प्रशासनाने चाकरमान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 29 ऑगस्ट म्हणजेच आजपासून मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव ही एक्स्प्रेस धावणार आहे. बोरीवली रेल्वे स्थानकातून या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरुन ही गाडी धावणार असल्याने वसई-विरार, बोरीवलीच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

कोकणात जाण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना सीएसएमटी किंवा एलटीटीवरुन ट्रेन पकडावी लागते. त्यामुळं बोरीवली स्थानकातून कोकणात जाण्यासाठी ट्रेन सोडण्यात याव्या, अशी मागणी होत होती. खासदार पियुष गोयल यांनीही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्निनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बोरीवलीहून वसईमार्गे कोकणात गाड्या सोडाव्यात, असं म्हटलं होतं. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. 

गणेशोत्सवाला अवघा एक आठवडा उरला आहे. त्याआधीच बोरीवलीहून वसईमार्गे गाडी सोडण्यात येणार आहे. आज 12.50 मिनिटांनी  बोरीवली रेल्वे स्थानकातून ही गाडी सुटणार आहे. आठवड्यातून दोन वेळा ही गाडी धावणार आहे. प्रथमच वसई-पनवेल या कॉरीडॉरचा वापर करुन वांद्रे-टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस सुरू करण्यात येत आहे. 

कशी असेल एक्स्प्रेसची वेळ

वांद्रे टर्मिनसवरुन ही एक्स्प्रेस सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी सुटणार आहे. त्यानंतर ती गोव्यात मडगावमध्ये रात्री 10 वाजता पोहोचणार आहे. मडगावहून पुन्हा वांद्रे टर्मिनससाठी ही गाठी 7 वाजून 40 मिनिटांनी सुटणार असून रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला 20 डबे असून त्यात सेकंड स्लीपर 8 डबे, थ्री टायर एसीचे 3 डबे,थ्री टायर एसी इकॉनॉमीचे 2 डबे, टू टायर एसीचा 1 डबा, जनरल 4 डबे, एसएलआर-1, पँट्री कार-1, जनरेटर कार-1 यांचा समावेश आहे. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी मडगाव येथून व बुधवारी आणि शुक्रवारी वांद्रे येथून सुटणार आहे. 

कुठे असेल थांबा

वांद्रे मडगाव एक्स्प्रेसला बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी या रेल्वे स्थानकांवर थांबा असेल.