मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता प्रवासाची मजाच न्यारी...

 प्रवाशांचा प्रवासही हा कायम स्मरणात राहवा आणि पर्यटनालाही चालना मिळावी, म्हणून रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल आहे. 

Updated: Jul 25, 2022, 10:37 AM IST
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता प्रवासाची मजाच न्यारी...  title=

मुंबई : मुंबई - पुणे प्रवास करण्यासाठी आनंदाची बातमी आहे. लॉकडाऊन काळात रद्द करण्यात आलेली मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आजपासून रुजू झाली आहे. मुंबई - पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या निसर्गाचा आनंदाचा घेता यावा म्हणून व्हिस्टाडोम कोच लावण्यात आले आहे. या कोचमुळे प्रवाशांना निसर्गाचे विहंगम दृष्य त्यांना अनुभवता येणार आहे. मुंबई - पुणे मार्गावरील ही तिसरी ट्रेन आहे. 

डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेसमध्ये  व्हिस्टाडोम  कोचसह धावणार आहे. प्रगती एक्स्प्रेस तिच्या नेहमीच्या वेळेत सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी पुण्यातून सुटणार आणि 11 वाजून 25 मिनिटांनी मुंबईला पोहचणार आहे. तर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून 4 वाजून 25 मिनिटांनी रवाना होणार आहे तर 7 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहचणार आहे.

आता प्रवासाची मजाच न्यारी

पुणे-मुंबई मार्गावर असलेले नदी, दरी, धबधबे या दृष्यांचा आनंद घेता येणार आहे. माथेरान टेकडी, सोनगीर टेकडी, उल्हास नदी, खंडाळ्यातील घाट यांचा मनमुराद आनंद प्रवाशांना या कोचमुळे घेता येणार आहे. रुंद खिडकीचे फलक आणि काचेचे छप्पर, फिरता येण्याजोग्या जागा आणि पुशबॅक खुर्च्या या व्हिस्टाडोम कोचचे विशेष आहेत. या कोचमुळे प्रवाशांचा प्रवासही हा कायम स्मरणात राहवा आणि पर्यटनालाही चालना मिळावी, म्हणून रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल आहे. 

कसा आहे विस्टा डोम?

या विस्टाडोम कोचला तिन्ही बाजूंनी काचेच्या खिडक्या आणि छतही काचेचे आहे. रात्रीच्या प्रवासादरम्यान पर्वत आणि दऱ्यांमधून जाणारे सुंदर ढग, आकाशातील तारे आणि चंद्राची मंत्रमुग्ध करणारी दृष्यं प्रवाशांचा आनंद द्विगुणीत करणार आहे. तसंच या कोचमध्ये वाय-फायची सुविधा आहे. कोचमध्ये 180-डिग्री फिरता येण्याजोग्या आलिशान जागासुद्धा आहे.