उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये गेल्या सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील एक जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल असून, गंभीर स्थिती आहे. यादरम्यान अपघातापूर्वीचा विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सर्व 7 विद्यार्थी एका रुममध्ये पार्टी करताना दिसत आहेत. दाव्यानुसार, पार्टी केल्यानंतर सर्व विद्यार्थी इनोव्हामधून फिरण्यास निघाले होते. पण कार वेगात असल्याने नियंत्रण सुटलं आणि एक ट्रकला जाऊन धडकली.
देहरादूनच्या ओएनजीसी चौकात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ट्रकला धडक दिल्यानंतर कारचा अक्षरश: चुरा झाला होता. अपघात इतका भीषण होती की, सहाही विद्यार्थ्यांनी जागीच आपला जीव गमावला. यामध्ये 3 तरुणी आणि 3 तरुण होते. यामधील फक्त एक विद्यार्थी जिवंत वाचला असून त्याचं नाव सिद्धेश अग्रवाल आहे. 25 वर्षीय सिद्धेश अग्रवाल सध्या शहरातील सिनर्जी रुग्णालयात आयुष्याशी लढा देत आहे. त्याची प्रकृती फार चिंताजनक आहे.
The car accident in Dehradun was so horrific that you can imagine its severity just by looking at the pictures.
Six soldiers lost their lives due to overspeeding and intoxication.
In road accidents, intoxication and high speed play a major#DehradunAccident #DehradunCarAccident pic.twitter.com/r5thvWJxut
— Sara (@sarakhaan65) November 15, 2024
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलींमध्ये गुनीत (19), नव्या गोयल (23) आणि कामाक्षी (20) यांचा समावेश आहे. या तिन्ही मुली देहरादून शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास होत्या. याशिवाय कुणाल कुकरेजा (23), अतुल अग्रवाल (24) आणि ऋषभ जैन (24) अशी मृत्यू झालेल्या तीन मुलांची नावे आहेत. त्यापैकी कुणाल हा हिमाचलमधील चंबा येथील रहिवासी होता, तर उर्वरित लोक देहरादूनचे रहिवासी होते. तर सातवा विद्यार्थी सिद्धेश अग्रवाल (25) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात मृत्यू झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अपघाताआधीचा अखेरचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातात वाचलेल्या एकमेव विद्यार्थी सिद्धेश अग्रवालच्या मोबाईलमधून पोलिसांना हा व्हिडीओ मिळाला आहे. व्हिडीओत सर्व विद्यार्थी एका रुममध्ये आनंदात नाचताना दिसत आहेत. काही सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. मात्र या व्हिडीओची पुष्टी करण्यात आलेली नाही.
दरम्यान पोलीस सध्या सिद्धेश अग्रवाल पूर्णपणे शुद्धीत आणि बोलण्याच्या अवस्थेत येण्याची वाट पाहत आहेत. त्याची चौकशी केल्यानंतरच अपघाताचं मूळ कारण समजू शकेल. सिद्धार्थ देहरादूनचा राहणारा आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक तपासात वेगाने गाडी चालवत असल्याने अपघात झाल्याचं समजत आहे.