मुंबई-पुणे अंतर आता आणखी कमी होणार, महत्त्वाच्या प्रकल्प डिसेंबरमध्ये होतोय खुला

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई-पुणे दोन शहरातील अंतर अर्ध्या तासांनी कमी होणार आहे. मिसिंग लिंक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: May 15, 2024, 12:04 PM IST
मुंबई-पुणे अंतर आता आणखी कमी होणार, महत्त्वाच्या प्रकल्प डिसेंबरमध्ये होतोय खुला title=
Mumbai to Pune Travel Time Cut by 25 Minutes by missing link

Mumbai Pune Missing Link Tunnel Project: मुंबई- पुणे या दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी आणि वाहतुक कोंडी फोडण्यासाठी या मार्गावर मिसिंग लिंकची उभारणी करण्यात येत आहे. हा मिसिंग लिंक प्रकल्प डिसेंबर 2024 मध्ये खुला होण्याची माहिती समोर येतेय. या प्रकल्पामुळं मुंबई-पुणे प्रवास (Mumbai To Pune) करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. मुंबई-पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. तसंच, अपघातातही घट होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठीचा बोगदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधण्यात आला आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर असून जगातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. 

मुंबई-पुण्यादरम्यान यशवंतराव चव्हाण महामार्गावरुन सध्या खंडाळा घाटातून प्रवास करावा लागतो. अनेकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी होते. अनेकदा नागरिकांना तासनतास या वाहतुककोंडीत अडकावे लागते. तसंच, मान्सून काळात या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनाही घडतात. म्हणूनच सरकारने मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे. खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेने दोन महाकाय बोगदे उभारण्यात येत आहेत. या दोन्ही बोगद्यांची कामे 98 टक्क्यांपर्यंत झाले आहे. तर, बोगद्यातील अंतर्गंत कामे सुरू आहेत. 

एकूण 13 किलोमीटर असलेल्या मिसिंग लिंकमध्ये दोन बोगद्यांव्यतिरिक्त दोन पुलदेखील उभारण्यात आले आहेत. यातील एका पुलाची लांबी 900 मीटर तर दुसरा पुल स्टेन्ड ब्रीज असून 650 मीटर लांब असेल.  या प्रकल्पामुळं मुंबई-पुणे दरम्यानचे 6 किमी अंतर कमी होणार आहे. 2019 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. तर, डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण करण्याची डेडलाइन होती. मात्र, अनेक कारणांमुळं ही डेडलाइन हुकली आहे. आता 2024 मध्ये मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला होईल, अशी अपेक्षा आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यादृष्टीने नियोजन केले आहे. 

मिसिंग लिंकचा फायदा काय?

मिसिंग लिंकमुळं मुंबई ते पुणे प्रवासाचे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. तसंच, वाहतुक कोंडी व प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. तसंच, आपत्कालीन एक्झिटसाठी 300 मीटरच्या अंतरावर बाहेर पडण्याचा मार्ग आहे. याशिवाय दरड कोसळू नये म्हणून ठिकठिकाणी रॉक बोल्ट लावण्यात आले आहेत.