मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या; पोलिसांच्या लुसीने एका तासात लावला खुनाचा छडा

लुसीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला काही वेळातच ताब्यात घेतलं.

Updated: Aug 13, 2020, 05:17 PM IST
मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या; पोलिसांच्या लुसीने एका तासात लावला खुनाचा छडा

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : शुल्लक करणावरुन मोठ्या भावानेच आपल्या लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना अमरावतीच्या बडनेरा शहराजवळच्या अकोला मार्गावरील हिंदू स्मशान भूमी परिसरात घडली. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी आरोपी असलेल्या मोठ्या भावाला एका तासात अटक केली आहे. मात्र या आरोपीला एका तासात पकडणं, पोलिसांच्या लुसी नावाच्या श्वानामुळे शक्य झालं. 

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, पोलीस लुसीला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांनी लुसीच्या मदतीने शोध सुरु केला आणि चक्क एका तासाच्या आत लुसीने आरोपीची ओळख पटवून दिली. रामदास गोमासे (55) असं मृतकाचं नाव असून राजाराम गोमासे (65) असं हत्या केलेल्या सख्ख्या भावाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजाराम गोमासेला अटक केली आहे. 

मागील काही महिन्यापासून रामदास बडनेराच्या अकोला मार्गावरील हिंदू स्मशानभूमी परिसरात राहत होते. या दरम्यान या दोघांचा शुल्लक कारणावरुन वाद झाला आणि याच वादातून राजाराम याने लहान भावाची निर्घुणपणे हत्या केली. रामदास यांच्या पोटात विळ्याने वार केल्याने गंभीर झालेल्या रामदास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर राजाराम घटनास्थळावरुन पसार झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर काही वेळातच लुसीच्या मदतीने पोलिसांनी रामदास गोमासेला ताब्यात घेतलं, पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानेच खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे आरोपी भावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.