मित्रा, मनाला चटका लावून गेलास रे! शालेय क्रीडा स्पर्धेत अपयश, विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

नागपूरमध्ये मन सून्न करणारी घटना, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शालेय स्पर्धेत आलेल्या अपयशामुळे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला

Updated: Dec 19, 2022, 02:46 PM IST
मित्रा, मनाला चटका लावून गेलास रे! शालेय क्रीडा स्पर्धेत अपयश, विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : जिल्हयात मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. शालेय क्रीडा स्पर्धेत (School Sports Game) आलेल्या अपयशामुळे एका 16 वर्षांच्या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं (Suicide). या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. निखिल तराळे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो एक चांगला धावपटू (Athlete) होता. नकापूर इथल्या क्रीडा संकुलनात जिल्हास्तरीय स्पर्धेत (District Level Competition) निखिलने उत्तम कामगिरी केली, त्यामुळे चंद्रपूर (Chandrapur) इथं होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेत (Divisional Sports Competition) त्याची निवड झाली. पण चंद्रपूरमधल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. 

अपयशाने निखिल खचला
विभागीय स्पर्धेतील अपयशाने प्रचंड खचला होता. याच नैराश्येतन त्याने आपल्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. निखिलच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी हिंगणा पोलीस पुढील तपास करत आहेत. निखिल हा इयत्ता दहावीत शिकत होता. 16 डिसेंबरला स्पर्धा संपल्यानंतर तो प्रचंड तणावात होता. याच तणावातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

विद्यार्थ्यांची आत्महत्येची कारणं
शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या करण्याच्या घटना गेल्या काही दिवसात वाढत आहे. मोबाईलवर गेम खेळण्यास मनाई केली, किंवा हातातला मोबाईल हिसकावून घेतला, अभ्यास करण्यासाठी तगादा लावला किंवा परीक्षेत अपयश आलं, अशी अनेक कारणं आहेत. काहीवेळा तर इंटरनेटवर काही व्हिडिओ बघतात आणि त्यासारखं अनुकरण्याचा मुलांकडून प्रयत्न होतो, या आणि अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतात.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी 
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये सुमारे 4.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक म्हणजे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असून महाराष्ट्रात 13,089 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी आहे. याशिवाय मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि ओडिशातही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. 

हे ही वाचा : What is Marriage? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक म्हणाले, 'जरा भेटायला ये'

मुलांची मानसिक स्थिती
विद्यार्थी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय का घेतात? त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असतात. आत्महत्या करण्याचा निर्णय एका दिवसात घेतला जात नाही, एखाद्या मुलाला टोकाचं पाऊल उचलण्यासाठी त्यावेळची परिस्थीती, घटना किंवा एखादी व्यक्ती जबाबदार असते. काळाबरोबर अनेक आव्हानं, समस्या मुलांसमोर येत असतात, त्या आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद लहानपणापासूनच मुलांमध्ये निर्माण करणं महत्त्वाचं आहे.