'किडनी विकणे आहे' सावकारी कर्जाला कंटाळलेल्या गरीब कुटुंबाने फोडला टाहो

Nanded: 'किडनी विकणे आहे' अशा आशयाचे पोस्टर नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर लागल्याने खळबबळ उडाली होती. सावकाराच्या धमक्यांना घाबरून एका गरीब कुटुंबाने हे पाऊल उचलले आहे. गरीब कुटुंब दोन वर्षापासून मुंबईत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

सतिश मोहिते | Updated: Oct 15, 2023, 09:45 AM IST
'किडनी विकणे आहे' सावकारी कर्जाला कंटाळलेल्या गरीब कुटुंबाने फोडला टाहो title=

सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड: 'किडणी विकणे आहे' अशा आशयाचे पोस्टर नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर लागल्याने खळबबळ उडाली होती. सावकाराच्या धमक्यांना घाबरून एका गरीब कुटुंबाने हे पाऊल उचलले आहे. गरीब कुटुंब दोन वर्षापासून मुंबईत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. हे कुटुंब नांदेडमध्ये पोहोचले असून त्यांनी लावलेल्या 'किडनी विकणे आहे'च्या पोस्टरने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील वाई येथील सत्यभामा चंचूलवाड यांचे पती बालाजी चंचूलवाड साप चावला होता. त्यांचा उपचारासाठी सत्यभामा यांनी मुदखेड येथील तिघांकडून व्याजाने दोन लाख रूपये घेतले होते. नंतर त्यांनी अनेक वेळा पैसे दीले मात्र व्याजाच्या पैश्यासाठी सावकारानी त्यांच्या पतीला जबर मारहाण केल्याचा महिलेचा आरोप आहे. सत्यभामा यांचा मुलगा सिद्धांत आणि मुलगी सृष्टी यांनी या प्रकरणी 2021 मध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून तक्रार केली होती. 

'कारवाई करा किंवा इच्छामरणाची परवानगी द्या' अशी त्यांनी मागणी केली होती . तेव्हा कुठलीच कारवाई झाली नसल्याने चंचूलवाड परीवाराने भीतीपोटी गाव सोडले होते. मागील अडीच वर्षापासुन हे कुटुंब मुंबईत होते. दोन दिवसापूर्वी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांनी 'किडनी विकणे आहे' असे पोस्टर लावले. त्यानंतर माध्यम आणि पोलिसांनी या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यांनतर ते नांदेडला आले. आम्हीच किडणी विकण्याची जाहिरात केली. राज्य सरकारकडे पत्राद्वारे तशी रीतसर मागणी केल्याचे महिलेने सांगितले. कुटुंबावर आलेले प्रसंग सांगताना या मुला , मुलीचे अश्रू अनावर झाले होते.

दरम्यान हा प्रकार चर्चेत आल्यानंतर शनीवारी रात्री सत्यभामा यांना मुदखेड पोलिसानी बोलावून जबाब नोंदवून घेतला. प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे मुदखेड पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक वसंत सपरे यांनी सांगितले.