योगेश खरे / नाशिक : महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील गॅस गळतीचे (oxygen leakage ) सीसीटीव्ही फुटेज 'झी 24 तास' च्या हाती लागले आहे. टँकरद्वारे गॅस भरताना उच्चदाब नियंत्रणात ( pressure control) न राहिल्याने गॅस टाकी फुटली आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गळती झाली. (Nashik oxygen leakage) त्यामुळे रुग्णालय परिसरात एकच हाहाकार माजला. धक्कादायक बाब म्हणजे हॉस्पिटलच्या गॅस टाकीत यापूर्वी लिकेज होते. त्यातच टँकरद्वारे गॅस भरताना pressure control नसल्याने टाकी फुटली आणि मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले. अनेक रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला. टँकमध्ये ऑक्सिजन भरत असताना आधीच गॅस टॅंकची पाईपलाई फाटलेली होती. त्यामुळे ऑक्सिजन हवेत पसरु लागला. त्यातच ऑक्सिजन भरताना प्रेशर कंट्रोल नसल्याने बाहेर पडणाऱ्या ऑक्सिजनला रोखता आले नाही. त्यामुळे मोठ्याप्रमाणात हा ऑक्सिजन रुग्णालय परिसरात पसरला.
बुधवारी (21 एप्रिल) टँकरमधून ऑक्सिजन गळतीमुळे 24 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. अचानक टँकरमधून ऑक्सिजन गळतीमुळे संपूर्ण रुग्णालय परिसरात धुराचा लोट उठला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. तसेच अपघातात ठार झालेल्यांच्या कुटूंबांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच महापालिकेकडूनही 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, ऑक्सिजन गळतीप्रकरणी (Oxigen Leakage) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या घटनेचा तपास आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.
राधाकृष्ण गमे यांचे अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली असून या समितीत एकूण सात सदस्य असणार आहेत. यामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गुंजाळ, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे, महापालिकेचे अधिक्षक अभियंता संदीप नलावडे तसेच ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत संपूर्ण राज्यात स्वयंसेवक म्हणून सेवा देणारे हर्षल पाटील यांचा या समितीमध्ये समावेश आहे.