दोन रिक्षा चोरल्या अन् कबुलीही दिली; कारण वाचून पोलिसांनीही मारला कपाळावर हात

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत एक चक्रावणारा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने दोन रिक्षा चोरल्या पण त्याचा कबुलीजबाब एकून पोलिसही चक्रावले आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 3, 2023, 02:15 PM IST
दोन रिक्षा चोरल्या अन् कबुलीही दिली; कारण वाचून पोलिसांनीही मारला कपाळावर हात title=
navi mumbai accused stole two rickshaws police held

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पावणे गावात एक अजब प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी गावातून दोन रिक्षा चोरीला गेल्या होत्या. पोलिसांनी शोध घेत चोरट्याला ताब्यात घेतलं. मात्र, त्याची चौकशी केल्यानंतर चोरीचे कारण ऐकताच पोलिसही चक्रावले आहेत. शमीम बशीर शेख, असं आरोपीचे नाव आहे. 

आरोपी शमीम बशीर शेख हा सांताक्रुज येथे राहतो. तर, ज्यांची रिक्षा चोरी झाली ते वामन मुकादम पावणे गावात राहतात. 17 जून रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी घराबाहेर त्यांची रिक्षा पार्क केली होती. मात्र, दुसऱ्यादिवशी सकाळी ते कामासाठी घराबाहेर निघाले तेव्हा घराबाहेर रिक्षा  नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराच्या आजूबाजूच्या परिसरात व गावात शोधाशोध केली. मात्र रिक्षा कुठेच सापडली नाही. 

रिक्षा न सापडल्याने मुकादम यांनी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात रिक्षा चोरी प्रकरणी तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसंच, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला होचा. रिक्षाचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पर्यायांचा वापर करत शोध घेण्याचे ठरवले. 

सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलिसांनी आरोपीची ओळख स्पष्ट झाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना चोराविषयी माहिती मिळताच त्यांनी सांताक्रुझ येथे जाऊन त्याचा शोध घेतला. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले त्यांनी तातडीने त्याला अटक केले आहे. तसंच, चोराकडे दोन रिक्षादेखील सापडल्या. पोलिसांनी या दोन्ही रिक्षा जप्त केल्या आहेत. माझ्या दोन रिक्षा सापडल्या नाहीत म्हणून मी सुद्धा दोन रिक्षा चोरी केल्या, असा कबुलीजबाब यावेळी त्याने पोलिसांना दिला होता. 

लॉकडाऊनच्या काळात शमीम यांच्या दोन रिक्षा चोरी झाल्या होत्या. तेव्हापासून त्यांची आर्थिक स्थिती खालावली होती. काही दिवसांपूर्वी ते तुर्भे एमआयडीसी परिसरात फिरत असताना पावणे येथे एक रिक्षा त्याच्या नजरेत आली. त्यानंतर त्यावर लक्ष ठेवत त्याने ती रिक्षा चोरी केली, असं चोरट्याने म्हटलं आहे. 

दरम्यान, रिक्षा चोरी केल्यानंतर त्याने पाच दिवस ती घराच्याच परिसरात पार्क केली होती. मात्र, पाच दिवस उलटूनही कोणी रिक्षा नेण्यासाठी आले नाही ते पाहून त्याने रिक्षाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यामुळं त्याचा व्यवसाय होऊ लागला. याच पद्धतीने त्याने दुसरीही रिक्षा चोरी केली होती. 

आरोपी शमीम शेख यांच्याकडे एक चावी होती त्याच चावीने त्याने पन्नासपेक्षा अधिक रिक्षा सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला यश आले  नाही अखेर योगायोगाने पावणे गावातील मुकादम यांच्या रिक्षाला ती चावी लागली आणि तो रिक्षा चोरी करुन घेऊन गेला. मात्र चोराचा कबुलीजबाब एकून पोलिसही चक्रावले आहेत.