जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : एखाद्या विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे प्रकार उघडकीस आलेत. मात्र खुद्द विद्यापीठच नक्षली चळवळीला प्रोत्साहन देत असेल तर? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एकीकडे सरकार नक्षली चळवळ मोडीत काढण्यासाठी जंग जंग पछाडत आहे, तर दुसरीकडे पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरच आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या वेबसाइटवर सेंटर फॉर सोशल सायन्सेस एंड हुमॅनिटीज या विभागाच्या माहितीमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे अपलोड करण्यात आली आहेत.
विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात संदर्भ माहिती म्हणून असा दस्तावेज अपलोड केला जातो. मात्र पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरील बहुतांश कागदपत्रे माओवादी विचारसरणीची भलामण करणारी आहेत.
सरकारनं बंदी घातलेल्या नक्षली संघटना आणि जहाल माओवादी नेत्यांशी संबंधित ही माहिती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशातील नक्षल चळवळ, काश्मीरबाबत फुटीरतावादी विचार, राज्य पोलीस, सीआरपीएफ, ग्रे हाऊंड्स यासारखं संरक्षण दल किंवा यंत्रणा आदिवासी नागरिकांवर कशा प्रकारे अत्याचार करतात याचा तपशील या कागदपत्रांमध्ये आहे.
रायतू कुली संघम, रॅडिकल स्टुडंड्स युनियन, रॅडिकल युथ लीग, सध्या जेलमध्ये असलेले वरावरा राव यांची रिव्हॉल्युशनरी रायटर्स असोसिएशन या प्रतिबंधित संघटनांची माहिती वेबसाइटवर आहे.
नागपूर विद्यापीठात प्राध्यापिका असलेल्या, नक्षली चळवळीत सक्रीय होऊन भूमिगत झालेल्या आणि पोलीस चकमकीत ठार झालेल्या अनुराधा गांधी, नक्षलवादी अंजण्णा सागर, पोलीस चकमकीत ठार झालेल्या नवीन बाबूची कलम संघटना, २ नोव्हेंबर १९८० ला सिरोंचात पोलीस चकमकीत मारला गेलेला महाराष्ट्रातील पहिला नक्षलवादी पेद्दी शंकर, नक्षलवाद्यांच्या सत्यशोधक समितीचा अहवाल, असा आक्षेपार्ह मजकूर वेबसाईटवर उपलब्ध आहे.
या संपूर्ण प्रकारच्या चौकशीची मागणी भूमकाल या नक्षलविरोधी संघटनेनं केली आहे. गेल्या ३० वर्षांत नक्षल चळवळीशी संबंधित ही कागदपत्रं पुणे विद्यापीठाला कोणी दिली? या कागदपत्रांचं वर्गीकरण कुणी केलं? वेबसाईटवर ती कुणी अपलोड केली? आणि या सगळ्या प्रकारावर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचं लक्ष होतं का ? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.