पुणे : जामखेड इथं हत्या करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवकांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर जामखेडकडे रवाना रवाना करण्यात आलेत. पुण्यातील ससून रुग्णालयात या दोघांचं शवविच्छेदन करण्यात आलंय. जामखेड हे गुन्हेगारांचं आगार झालं आहे. लहान लहान मुलांकडे रिव्हॉल्वहरसारखी हत्यारं आहेत. ही बाब गंभीर असल्याची टीका माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय मृत योगेश आणि राकेश राळेभात यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतलीय. तसंच जामखेडमधील गुन्हेगारीसाठी पालकमंत्री आणि जामखेडचे आमदार राम शिंदे जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
शनिवारी अज्ञाताकडून गोळ्या झाडून योगेश आणि राकेश राळेभात यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. महिन्याभरातील राजकीय हत्याकांडाची ही दुसरी घटना आहे.