साहेबांसाठी काहीपण....! शेतात साकारली पवारांची प्रतिमा

भव्यतेलाही लाजवेल असंच हे चित्र

Updated: Dec 15, 2019, 11:54 AM IST
साहेबांसाठी काहीपण....! शेतात साकारली पवारांची प्रतिमा title=
शरद पवारांसाठी काहीपण....!

उस्मानाबाद : महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये गेली कित्येक वर्षे आपल्या प्रभावी आणि लक्षवेधी कारकिर्दीने युवा नेत्यांना आणि सर्वसामान्यांना कायमच प्रोत्साहित करणाऱ्या शरद पवार यांचा ८०वा वाढदिवस नुकताच पार पडला. राजकारणाच्या आघाड्यातील कसलेला मल्ल म्हणून पवारांचा उल्लेख केला जातो तो उगाच नाही, याचा प्रत्ययही यंदाच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतरच्या दिवसांमध्ये दिसला. 

सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये तर, त्यांना जणू राजकीय कौशल्यच पणाला लावलं होतं. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामध्ये योग्य तो समतोल राखत घो़डदौड करणाऱ्या याच शरद पवार यांना त्यांच्या यंदाच्या वाढदिवसानिमितताने खास अंदाजात शुभेच्छा देण्यात आल्या. या शुभेच्छा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला आणि कार्याला साजेशा ठरत आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण, या शुभेच्छा जोडल्या गेल्या आहे शेतीशी. 

निपाणी, उस्मानाबाद येथील मंगेश निपाणीकर या तरुण शेतकऱ्याने हरभरा, आळीव, ज्वारी, मेथी, गहू या पिकांपासून शरद पवार यांची भव्य प्रतिमा आपल्या शेतातच साकारली आहे. पिकांच्या माध्यमातून तब्बल चार एकरांच्या भूखंडावर साकारण्यात आलेली शरद पवार यांची ही विक्रमी प्रतिमा सध्या अनेकांच्याच आकर्षणाचा विषय ठरत आहे. मंगेश निपाणीकर याने पवारांची ही प्रतिमा साकारण्यासाठी शंभर दोनशे नव्हे, तर ६०० किलो बियाण्यांचा वापर केला आहे.

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

एक भव्य गोल रिंगण (पिकांचं), त्यामध्ये आणखी एक रिंगण ज्यामध्ये अतिशय सुरेख अशा पद्धतीने शरद पवार यांच्या चेहऱ्यावरील बारकावे टीपत ही प्रतिमा आकारास आली आहे. ज्याखाली साहेब अशी अक्षरही लिहिली गेली आहेत. ही अतिशय कलात्मकतेने साकारण्यात आलेली ही प्रतिमा म्हणजे कलात्मकता आणि शेतीचं सर्वोत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही.