मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन राष्ट्रवादीशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्यामागे आमदार आले नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सिल्व्हर ओकवर जाऊन त्यांनी पक्ष अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आज विधानभवनात त्यांनी हजेरी लावली. विधानभवनाच्या बाहेर आज राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी सर्व आमदारांचे स्वागत केले. यावेळी अजित पवारांच्या प्रवेशावेळी त्या आनंदीत पाहायला मिळाल्या. माझा दादा परत आलाय अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली. अजित पवार यांना मंत्रिपद मिळणार का ? असा प्रश्न राष्ट्रवादी नेते जयंत यांना पत्रकारांनी अजित पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारला.
आज अजित पवार बैठकीला आले त्यांनी सगळयांना मार्गदर्शन केलं. जे घडलं त्या विषयावर आता पडदा पडल्याचे सांगत जयंत पाटील यांनी प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांना महत्त्वाचं मंत्रिपद देण्याबाबत अजून कुठलाच निर्णय झालेला नाही. त्याबाबत शरद पवार निर्णय घेतील असेही पाटील म्हणाले. अजित पवार यांना मंत्रिपद देण्याबाबतची काही चर्चा झाली नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांना देखील महाआघाडीत चांगलं स्थान मिळेल. ते खूप मोठं काम करुन आले आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, भाजपकडून अघोरी प्रयोग करण्यात आला. महाराष्ट्राच्या जनतेने सगळं उद्धवस्त केलं. आता अशा प्रकारचे प्रयोग नाही चालणार आणि महाराष्ट्राचा परिणाम इतर राज्यांवर देखील पाहायला मिळेल असेही राऊत यावेळी म्हणाले.