ठाकरे - मोदी भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चेला शरद पवारांकडून पूर्णविराम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावर शरद पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Jun 10, 2021, 03:52 PM IST
ठाकरे - मोदी भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चेला शरद पवारांकडून पूर्णविराम  title=
दीपक भातुसे झी मीडिया मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्यावर शरद पवार यांनी देखील भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इतिहासाचा दाखला देत या भेटीवर  भाष्य करताना महाविकास आघाडी सरकार 5 टिकेल.
 
हे सरकार केवळ पाच वर्ष टिकणारच नाही तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र येऊन जोमानं काम करेल असा विश्वास व्य़क्त केला. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
मुख्यमंत्री पंतप्रधानांना वेगळे भेटले त्याबाबत चर्चा  सुरू झाल्या, पण त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. असं शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे. शिवसेनेसोबत एकत्र काम करू असं कधीही वाटलं नव्हतं; पण आपण पर्याय दिला आणि लोकांनी त्याचं स्वागत केलं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
 
यावेळी बोलताना त्यांनी इतिहासातील एका घटनेची आठवण करून दिली. शरद पवार म्हणाले की, 'महाराष्ट्रात शिवसेनेला मी गेली अनेक वर्ष पाहात आहे. काँग्रेसला पाठिंबा देणारा शिवसेना हा फार पूर्वीपासूनचा एकमेव पक्ष आहे. मी असं म्हणायचं कारण की ज्यावेळी जनता पक्षाचे राज्य आले आणि काँग्रेसचा पराभव झाला तेव्हा शिवसेना काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली. 
 
'शिवसेनेनं इंदिरा गांधींना पुढच्या निवडणुका न लढवण्याचं वचन दिलं आणि ते शेवटपर्यंत पाळलंही. शिवसेनेनं त्यावेळी ठाम भूमिका घेतली होती. हा इतिहास विसरता येणार नाही.'
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
 
-  राजकारणात सतत नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचं काम केलं पाहिजे
नव्या चेहऱ्यांना तरुणांना संधी दिली पाहिजे
-  लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. त्याबरोबर नेतृत्वाची फळी घडवण्याचं काम होतंय ते माझ्यासाठी महत्त्वाचं
- ठाकरे सरकार आज सरकार चांगले काम करत आहे.
- हे सरकार पाच वर्ष निश्चित काम करेल
- केवळ पाच वर्ष नाही आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने एकत्र काम करतील 
- हे सरकार टिकेल की नाही याची चर्चा होत होती आज ती होत नाही