"कधी पाहिलं नाही त्यांची पूजा का करायची?"; देवी सरस्वतीबाबत भुजबळांच्या वक्तव्यामुळे नवा वाद

माफी मागत वक्तव्य मागे घेण्याची भाजपची मागणी

Updated: Sep 27, 2022, 11:53 AM IST
"कधी पाहिलं नाही त्यांची पूजा का करायची?"; देवी सरस्वतीबाबत भुजबळांच्या वक्तव्यामुळे नवा वाद title=

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या एका वक्तव्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.  देवी सरस्वती (saraswati) आणि देवी शारदेच्या फोटोवरुन छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये (school) सरस्वती (saraswati) आणि शारदेऐवजी महापुरुषांचे फोटो (Photo) लावले पाहिजेत असं विधान केलंय. सोमवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी हे वक्तव्य केलं. या विधानावरुन भाजपने (BJP) आक्षेप घेत भुजबळ यांनी माफी मागावी अशी मागणी केलीय. (New controversy due to Chhagan Bhujbal statement about Devi Saraswati Sharda )

काय म्हणाले छगन भुजबळ?

“शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं.

भुजबळ यांनी स्टेजवर असलेल्या महापुरुषांच्या फोटोंकडे हात करत, "यांच्यामुळेच तुम्हाला शिक्षण मिळालं. अधिकार मिळाले आणि सगळं मिळेल. यांची पूजा करा हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव समजून यांची पूजा झाली पाहिजे. यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे. बाकीचे देव-बीव आहेत ते नंतर बघूयात,” असेही म्हटलं.

छगन भुजबळांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी टीका करत , "आता भुजबळांनी शाळांतील देवतांची चित्रे हटवण्याची भाषा केली आहे. पुढे जाऊन मंदिरांची काय गरज आहे हे असे सांगू शकतात. त्यामुळे त्यांनी याबाबत माफी मागितली पाहिजे.  निवडणुकीची वेळ आली की हेच नेते हिंदूंच्या देवदेवतांच्या मंदिरात डोकं टेकवण्याचे नाटक करतात आणि आता देवदेवतांच्या चित्रांची काय गरज आहे, ती हटवा, असे म्हणत आहेत. सर्व महापुरुषांबद्दल आपल्याला आदर आहे, पण देवतांचा असा अपमान करू शकत नाही."