अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : पक्षी, प्राणी आणि फुलांना इंग्रजीबरोबच मराठीतही नावं आहेत. पण फुलपाखरांना मराठीतली नावं मिळाली नव्हती. आता फुलपाखरांचं मराठीत बारसं झालं आहे. नीलपर्ण, पीत भिरभिरी, पवळ्या, रत्नमाला, झिंगोरी, हळदीकुंकू ही फुलपाखरांना नव्यानं मिळालेली मराठी नावं आहेत. आतापर्यंत फुलपाखरांच्या सगळयाच जातींची नावं इंग्रजी किंवा लॅटिनमध्ये उपलब्ध होती. मात्र आता महाराष्ट्रात अढळणाऱ्या फुलपाखरांना मराठी नावं मिळाली आहेत.
राज्यात फुलपाखरांच्या ३७७ जाती आहेत. या सर्व जातींची मराठी नावं राज्य जैव विविधता मंडळाने निश्चित केली आहे. हबशी, भटक्या, गडद गवत्या. नवाब, तरंग ही त्याची काही उदाहरणं आहेत.
ब्लू मॉरमॉन अर्थात नीळवंत या फुलपाखराची 2015 मध्ये राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करण्यात आली. राज्य फुलपाखरू जाहीर करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं. लवकरच या नावांची छायाचित्रांसहित पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. ज्याचा फायदा फुलपाखरू प्रेमी आणि अभ्यासकांनाही होणार आहे.