कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एका रात्रीत बनलेला एक रस्ता चांगलाच गाजतोय. हा रस्ता म्हणजे आमदार महेश लांडगे यांनी केलेला 'सर्जिकल स्ट्राईक' असल्याचा प्रचार सध्या सोशल मिडियावर सुरू झाला आहे. तर ही स्टंटबाजी असल्याची टीका विरोधकांकडून सुरू झाली आहे. आमदार महेश लांडगे यांचा सर्जिकल स्ट्राईक....एका रात्रीत केला रस्ता तयार...दिघी ते भोसरी रस्ता तयार.....! अशी वाक्य सध्या सोशल मीडियात चर्चेत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या सोशल मिडियावर महेश लांडगे यांच्या कौतुकाच्या या पोस्ट चांगल्याच व्हायरल होत आहेत.
जमिनीच्या वादामुळे भोसरी ते दिघी दरम्यान रस्त्याचे काम होत नव्हते. पण त्या ठिकाणी एकाच रात्रीत रस्ता तयार झाला. हा रस्ता महेश लांडगे यांच्या प्रयत्नांतून झाल्याचा दावा त्यांचे पाठीराखे करत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र त्यावर जोरदार टीका केली आहे. दिघी काय पाकिस्तान मध्ये आहे का ? असा सवाल करत आमदारांची ही स्टंटबाजी असल्याची टिका केली जात आहे. महापालिकेने हे काम केले असून त्यात आमदारांचे काय श्रेय ? असा सवाल ही विरोधकांनी उपस्तिथ केला जात आहे.
रस्ता दिला त्यात जाहिरात करण्याची गरज नाही. मुळात कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेण्याची राजकारण्यांची सवय असल्याने ते घेणार यात ही शंका नाही असा टोलाही आमदार लांडगे यांना लगावला आहे. कारण काहीही असो एका रात्रीत रस्ता झालाय आणि सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही यावर चर्चा करण्याची संधी मिळाली आहे.