नगरची पाण्याची चिंता मिटली, निळवंडे धरण भरलं

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पुढे प्रवरा नदीवर असलेले निळवंडे धरण तांत्रिकदृष्ट्या भरलंय.

Updated: Jul 29, 2017, 12:24 PM IST
नगरची पाण्याची चिंता मिटली, निळवंडे धरण भरलं  title=

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पुढे प्रवरा नदीवर असलेले निळवंडे धरण तांत्रिकदृष्ट्या भरलंय. आठ हजार तीनशे दशलक्ष घनफूट इतकी क्षमता असलेल्या निळवंडे धरणात सध्या सात हजार नऊशे दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे.

सध्या धरणातून दोन हजार तीनशे क्यूसेक वेगाने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती धरणाचे अभियंता जी.जी. थोरात यांनी दिलीय. उत्तर नगर जिल्ह्याला प्रवरा नदीवर असलेली भंडारदरा आणि निळवंडे ही दोन धरणं वरदान मानली जातात.

भंडारदरा धरण 24 जुलैलाच भरल्यामुळे निळवंडे धरणाकडे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता. त्यामुळे आता निळवंडे धरणसुद्धा भरल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटल्याने समाधान व्यक्त होतंय.